सोन्याच्या हव्यासातून कोल्हापूरात दुर्घटना
सोन्याच्या मागणीसाठी ११ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दर्शन रोहित शहा असे या दुर्दैवी बालकाचे नांव आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरले. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपास केला. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास यश आले नव्हते.
सुरक्षानगर परिसरामध्ये आई व आजी यांच्याकडे दर्शन रोहित शहा हा राहत होता. ११ वर्षांचा दर्शन मंगळवारी सायंकाळी खेळण्यासाठी बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे त्याची आई स्मिता यांनी दर्शन बेपत्ता झाल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली होती. पोलिसांनी रात्रभर दर्शनच्या शोधासाठी मोहीम राबविली होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहा यांच्या घरासमोर एक बंद पाकीट मिळाले. त्यामध्ये हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या मजकुराचे पत्र मिळाले. एका बांधकाम व्यावसायिकाच्या मशिनरीजवळ सकाळी १० वाजेपर्यंत २५ तोळे सोने आणून द्यावे. सोने आणून दिले नाही, तसेच पोलीसांकडे गेला त तर दर्शनला ठार केले जाईल, असा इशारा या पत्रामध्ये दिला होता.
या प्रकाराची माहिती स्मिता शहा यांनी पोलिसांना दिली. त्यावर पोलीस यंत्रणा अधिकच सतर्क झाली.पोलीस तसेच परिसरातील नागरिकांनी दर्शनच्या शोधासाठी मोहीम राबविली. शहा यांच्या घरापासून सुमारे१०० मीटर अंतरावर राऊत यांची विहीर आहे. या विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला.
दर्शन याचे अपहरण करून खून केला असावा, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत.