यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील मुळावा गावाजवळ भांबरखेडा शिवारात एका शालेय विद्यार्थ्यांचा खून करून मृतदेह रस्त्यालगत दूरसंचार दूरध्वनी सेवेसाठी खोदलेल्या नालीत पुरण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. संतोष शंकर डांगे (१४, रा. लासीना, जि. हिंगोली), असे मृताचे नाव आहे.

संतोष २ डिसेंबरला सकाळी घरून शाळेत जाण्याकरिता निघाला. परंतु तो सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने मुलाच्या पालकांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी सकाळी ७ वाजता भांबरखेडा शिवारातील ग्रामस्थांना रस्त्यालगत दूरसंचारच्या केबलसाठी खोदण्यात आलेल्या नालीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला. भांबरखेडा येथील पोलीस पाटलांनी पोफाळी पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. पोफाळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनास्थळापासून काही अंतरावर संतोषचे दप्तर आढळून आले. त्यामुळे त्याची ओळख पटण्यास मदत झाली. त्याआधारे कळमनुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. यवतमाळ येथील श्वानपथकास पाचारण करण्यात आले. मृतदेह जमिनीत पुरलेला असल्याने उमरखेड व पुसद महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर तो खड्डय़ाबाहेर काढण्यात आला. अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण कळमनुरी पोलिसांना हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पोफाळी पोलिसांनी दिली.