महाराष्ट्रात यापूर्वी १५ जून पासून शाळा सुरू करण्यावर विचार सुरू होता. परंतु आता शाळा सुरू करण्याऐवजी केवळ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात १५ जून आणि २६ जून रोजी (विदर्भ क्षेत्रासाठी) तसंच ग्रीन झोनमध्येही शाळा सुरू होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

गेल्या रविवारी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीनं शाळा जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच राज्यातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरही भर देण्याची गरज असल्याचं मंत्र्यांनीदेखील सांगितलं होतं. “सध्या गुगल क्लासरूम वापरली जाऊ शकते. तसंच येत्या काळात स्वतंत्र संगणक आधारित प्रणाली विकसित केली जावी,” असंही ते म्हणाले.

“शालेय शिक्षण विभागाला विनामूल्य ऑनलाइन वर्गांची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल तयार आहे. शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उत्सवाच्या सुट्ट्या कमी करण्याचा आणि शैक्षणिक वर्षाचा कालावधी मेपर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ”अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिली.

काय म्हणाले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री?

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी तीन जून रोजी बीबीसीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भातील प्रश्न निशंक यांना विचारण्यात आला. त्यावेळी १६ मार्चपासून देशभरामध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगितले. मे महिन्यात समोर आलेल्या काही वृत्तानुसार जुलै महिन्यामध्ये ३० टक्के हजेरीसहीत देशभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु होती. इयत्ता आठवीपासून पुढील वर्ग हे ३० टक्के हजेरीसहीत सुरु करण्यात येतील असं म्हटलं जात होतं. सुरुवातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील शाळा सुरु होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले जातील अशा चर्चा सुरु असतानाच निशंक यांनी या चर्चांना पूर्वविराम दिला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पत्रक जारी करुन शाळा इतक्यात सुरु होणार नसल्यासंदर्भातील माहिती दिली होती.

“सध्या घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल १५ ऑगस्टपर्यंत लावण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये ज्या परीक्षा झाल्या आहेत आणि ज्या होणार आहेत त्यांचाही निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती निशंक यांनी दिली. त्यानंतर निशंक यांना म्हणजेच शाळा आणि महाविद्यालये १५ ऑगस्टनंतर सुरु होणार असंच म्हणता येईल का असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या महिलेने विचारला. त्यावर निशंक यांनी ‘अर्थात’ असं उत्तर दिलं.