ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांशी संवाद 

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मुख्यकार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम , रायगडचे जिल्हााधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या  प्रतिनिधींनी रविवारी मुठवली गावाला भेट देवून ग्रामस्थाशी संवाद साधला . याच गावात रंग दे महाराष्ट्र अभियानातून शाळांच्यां भिंती रंगवण्याचा  प्रारंभ मान्यवरांच्या  उपस्थितीत झाला .

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करु शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे,  ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गावाने एकत्र येऊन ठरवावे, त्यांना हवा तो विकास ते करु शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल.  गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे, जेणे करुन स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल , असे जिल्हा धिकारी म्हणाले . आपल्या भाषणात रामनाथ सुब्रहमण्यम यांनी  हे अभियान गावकरी आणि शासन  यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे मॉडेल ठरावे व त्याची सुरुवात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे’,  असे आवाहन केले.

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावातील जिल्हा परिषद  शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. ‘रंग दे महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जिल्ह्यतील मुठवली येथील शाळेच्या भिंती रविवारी रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या िभतींवर शैक्षणिक चित्रे चितारण्यात आली. या अभियानात आज स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रहमण्यम हेही सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी दिघावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर, उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार तसेच ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.