आता घटनास्थळीच गुन्ह्य़ाची वैज्ञानिक तपासणी होणार

पोलिस दलाचा तपास संथगतीने होतो. त्यामुळे वेगाने तपास होऊन गुन्हेगाराला तात्काळ अटक व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. राज्यातील जनतेची ही मागणी लक्षात घेता पोलिस दलाच्या तपासाच्या प्रचलित पध्दतीला गती आणण्यासाठी राज्य शासनाने न्यायसहायक वैज्ञानिक तपासणी वाहनाची निर्मिती केली आहे. यातीलच पहिले वाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, या वाहनात अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त १३ किटस् असून गुन्हा घडल्यावर गुन्ह्य़ाची वैज्ञानिक तपासणी घटनास्थळीच होणार आहे.

राज्यात गुन्हेगारी झपाटय़ाने वाढत आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार, चोरी, दरोडे, हत्या, फसवणुकीसह मादकद्रव्यांची तस्करी व आता चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्य़ात अवैध दारूची तस्करी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मात्र या घटनांचा तपास वेगाने होत नाही, ही सर्वसामान्यांची तक्रार आहे. तपासानंतरही गुन्हेगाराला शिक्षा होण्यास बराच अवधी लागतो. हे सारे लक्षात घेऊन राज्य शासनाने पोलिस दलाच्या तपासाचे प्रचलित पध्दतीत गतीमानता आणण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक तपासणी फिरते वाहनाची निर्मिती करून त्यातील एक वाहन चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या स्वाधीन केले आहे. या वाहनाचा उपयोग जिल्ह्य़ातील महिलांविरुध्द घडणाऱ्या गुन्ह्य़ांच्या घटनास्थळीच जाऊन त्याचयाशी निगडीत पुराव्याचे नमुने घेऊन या पुराव्यांची तपासासाठी उपयोग होणार आहे. हे वाहन अत्याधुनिक सोई-सुविधांनी युक्त असून त्यात एकूण १३ किटस् आहेत. त्यात जनतर क्राईम सिन इन्व्हेंस्टिगेशन किट, बुलेट होल टेस्टिंग किट, सिमेन डिटेक्शन किट, ब्लड डिटेक्शन किट, फिंगरप्रिंट डेव्हलपर किट, डीएनए सॅम्पल कलेक्शन किट, जनरल फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी किट, फॉरेन्सिक लाईट सोर्स, क्राईम सिन इल्युमिशन किट, एक्सप्लोझिव्ह डिटेक्शन किट, नार्कोटिक डिटेक्शन किट, गनशॉट रेसिडय़ू कलेक्शन किट इत्यादींचा समावेश आहे. यात फॉरेन्सिक तज्ज्ञ, ठसेतज्ज्ञ, छायाचित्रकार राहणार आहेत.

या औद्योगिक जिल्ह्य़ात अवैध दारू तस्करी आणि इतर गुन्ह्य़ातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेषत्वाने हे वाहन देण्यात आलेले आहे. राज्याचे पोलिस महानिरीक्षक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते या न्याय सहायक वैज्ञानिक तपासणी फिरत्या वाहनाचे लोकार्पण झाले. या वाहनाचा लाभ जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांना होणार आहे. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यावर गुन्ह्य़ाची वैज्ञानिक तपासणी घटनास्थळीच होणार असल्याने पोलिस दलाची जबाबदारी वाढलेली आहे, तसेच राज्य पोलिस दलासोबतच चंद्रपूर जिल्हा पोलिस दल आधुनिकतेच्या दिशेने एकेक पाऊस समोर टाकत आहे.