रायगड जिल्ह्य़ातील दादर येथे बुधवारपासून नवीन सागरी पोलीस स्टेशन अस्तित्वात आले आहे.  २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्ह्य़ात सुरू केले जाणारे हे पाचवे सागरी पोलीस स्टेशन असणार आहे. या पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे सागरी सुरक्षा अधिक बळकट होऊ शकेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी व्यक्त केला.
  मुंबईत १९९२ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी रायगडमधील शेखाडी परिसराचा वापर करण्यात आला होता. तर २६-११ च्या दहशतवादी  हल्ल्यासाठी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सागरी मार्गच निवडला होता. या दोन्ही हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहे. यानुसार कोकण किनारपट्टीवर ९ सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
 याचाच एक भाग म्हणून आता रायगड जिल्ह्य़ातील दादर इथे नवीन सागरी पोलीस ठाणे सुरू करण्यास गृहमंत्रालयाने मंजुरी दिली होती. यानुसार बुधवारपासून दादर हे नवीन सागरी पोलीस स्टेशन अस्तित्वात आले आहे. या पोलीस स्टेशनअंतर्गत पेण तालुक्यातील २७ गावे येणार आहेत. यात प्रामुख्याने दादर, जोहे, हमरापुर, कोपर, कळवे, वरंडी, रावे खारपाडा यांसारख्या गावांचा समावेश असणार आहे. १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि २५ पोलीस कर्मचारी असा स्टाफ या पोलीस ठाण्यात कार्यरत असणार आहे. तर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक यू. जी. जाधव काम पाहणार आहेत.
दादर या नव्या सागरी पोलीस ठाण्याच्या निर्मितीनंतर आता रायगडमधील सागरी पोलीस स्टेशनची संख्या पाचवर गेली आहे. यात नवी मुंबई आयुक्तालयातील मोरा आणि एनआरआय कॉलनी पोलीस ठाण्यांचा तर रायगड पोलीस अधीक्षक हद्दीतील मांडवा, दिघी आणि दादर या पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे.
दादर येथील सागरी पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे सागरी सुरक्षा अधिक बळकट होऊ शकेल, असा विश्वास रायगडचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या पोलीस स्टेशनसाठी शासनाने जागाही उपलब्ध करून दिली आहे. लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र जोवर स्वत:ची इमारत बांधून तयार होणार नाही तोवर भाडेतत्त्वावरील जागेत हे पोलीस स्टेशन सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.