सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बनावट नळजोडण्यांद्वारे पाण्याची चोरी होत असून ती रोखावी म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनीच आयुक्त विजयकुमार काळम यांना गळ घातली खरी; परंतु त्यानुसार पालिका प्रशासनाने पाणी चोरी शोध मोहीम हाती घेतली पहिल्या दिवशीच सुमारे शंभर बनावट नळ जोडण्या आढळून आल्या. यात संबंधित पाणीचोरांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यात येत आहेत.
शुक्रवारी पहिल्या दिवशी अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्यानुसार संबंधितांवर पाणी चोरीची कारवाई होण्यापूर्वीच काही भागात या कारवाईला विरोध झाला. रविवार पेठेतील भुलाभाई चौक, जोशी गल्ली, वडार गल्ली भागात महापालिकेच्या पथकाने अनधिकृत नळ जोडण्या शोधण्याचे काम हाती घेऊन सुरुवातीला पाच अनधिकृत नळ जोडण्या शोधल्या असता तेथील नागरिकांनी या मोहिमेला विरोध करीत गोंधळ घातला. पालिकेच्या पथकाला धक्काबुक्की व शिवीगाळ तथा दमदाटी केली गेली. त्या ठिकाणी गोंधळ वाढल्यानंतर जादा पोलीस कुमक दाखल झाली. परंतु महापालिकेला तेथील कारवाई अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
दरम्यान, सायंकाळी चार वाजेपर्यंत झालेल्या शोधमोहिमेत ३४५२ नळजोडण्यांची तपासणी होऊन त्यापकी ८२ नळ जोडण्या अनधिकृत असल्याचे आढळून आले.यात महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांकडेही अनधिकृत नळजोडण्या आढळून आल्या. याबाबतची माहिती सायंकाळी पालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी पत्रकारांना दिली.
या मोहिमेत सापडलेल्या अनधिकृत नळजोडणीधारकांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. जादा पोलीस बंदोबस्त घेऊन अनधिकृत नळजोडण्या शोधून काढण्याची मोहीम यापुढेही निरंतर चालूच राहणार आहे. पाणीचोरांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार असल्याचे बोल त्यांनी सुनावले.
काही दिवसांपूर्वी पालिका सर्वसाधारण सभेत शहरातील पाणीप्रश्नावर चर्चा झाली, तेव्हा अनेक सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनधिकृत नळ जोडण्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यावर नगरसेवकांची साथ मिळणार असेल तर कारवाईची मोहीम सुरू केली जाईल, असे आयुक्त काळम यांनी स्पष्ट केले व त्यानुसार कारवाई मोहीम हाती घेतली. यात पहिल्याच दिवशी सुमारे शंभर अनधिकृत नळ जोडण्या सापडल्या. बेकायदेशीर सार्वजनिक नळ जोडण्यात तोडण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे पाणीदराची थकबाकी असेल, तर त्यांच्याकडील नळजोडण्या कापण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.