सोलापुरात करोना विषाणूचा फैलाव झपाटय़ाने होत असताना मुरारजी पेठेत एका मटण विक्रेत्यालाही करोनाची बाधा झाली आहे. गेल्या आठ दिवसांत किमान तीनशे ग्राहक या मटण विक्रेत्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या ग्राहकांना मटण खरेदी करणे चांगलेच महागात पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, करोनाबाधित मटण विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. संबंधित मटण विक्रेत्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि पश्चिम व दक्षिण भागाला जोडणाऱ्या मुरारजी पेठेत संबंधित करोनाबाधित रुग्णाचे मटण व चिकन विक्रीचे दुकान आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने करोनाचा फैलाव टाळण्यासाठी मटण व चिकन व्यवसायावर बरीच बंधने आणली होती. परंतु संबंधित करोनाबाधित रुग्ण ग्राहकांना मागणीप्रमाणे मटण व चिकनचा पुरवठा करीत होता. त्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दीही पडायची. अलीकडे काही दिवसांपासून या मटण विक्रेत्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता त्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.

प्रशासनाने या घटनेनंतर संबंधित मटण विक्रेत्याशी मागील आठवडाभरात किती आणि कोणकोणत्या ग्राहकांचा संपर्क झाला, याची माहिती घेण्याचे व संबंधित ग्राहकांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्याचे काम हाती घेतले आहे.