‘लोकसत्ता’चे मुजावर यांच्यासह पत्रकारांचा सन्मान

पंढरपूर : आजच्या घडीला शोध पत्रकारितेची आवश्यकता असल्याचे मत नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. तसेच ‘समाज माध्यमा’च्या वापरावर प्रत्येकाने मर्यादा आणून कौटुंबिक संवादाला तितकंच महत्त्व द्यावे, असे सांगत सहा वर्षांपर्यंत मुलांना मोबाइल पासून दूर ठेवण्याचा सल्ला डॉ. लहाने यांनी दिला.

माढा प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकरिता सन्मान सोहळाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लहाने बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अ‍ॅड मीनल साठे होत्या. डॉ लहाने म्हणाले, की आज सकारात्मक पत्रकारितेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून यामधून आदर्शदायी कामे पुढे येतील. या क्षेत्रात व्यवसायिकता आली असली तरी आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आहे. शोध पत्रकारितेची आजच्या घडीला आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी ‘लोकसता’चे वरिष्ठ प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांना विष्णुपंत बेंबळेकर पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सोबत राजकुमार नरुटे, प्रशांत आराध्ये, विठ्ठल सुतार, शहाजी फुरडे-पाटील, संतोष पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी माजी आ. धनाजी साठे, आ. संजय शिंदे, अ‍ॅड  धनंजय माने, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे, दादासाहेब साठे, झुंजार भांगे, सुहास पाटील, संजय पाटील घाटणेकर, शिवाजी कांबळे, प्राणिमित्र विलास शहा, संतोष पवार, बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड  योगेश मुकणे, जहीर मणेर उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी स्वागत तर प्रमोद गोसावी यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण राऊत यांनी सूत्रसंचालन केले.