भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या गुरुवारी करवीरनगरीत पाऊल टाकल्यावर पक्षाला सन्मानपूर्वक जागा वाटप करण्याचा मुद्दा ठासून मांडला होता. तो इतका प्रभावी ठरला की काल गुरुवारी जागा वाटपाच्या मुद्दय़ावरूनच महायुतीची २५ वर्षांच्या मत्रीला पूर्णविराम मिळाला. महायुतीच्या सांघिक ताकदीमुळे कधी नव्हे इतके प्रभावी वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. यामुळे त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक विधानसभा गडावर भगवा फडकेल असे चित्र निर्माण झाले होते. पण आता भाजपा व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्याने उभय पक्षांना ताकदीचे उमेदवार प्रत्येक उमेदवारात शोधून काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरी चेहरा लाभलेल्या भाजपाला तर निम्म्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याचा पेच निर्माण झाला असून त्यांची आयारामांवर भिस्त राहणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जोड भाजपाला मिळाल्याने बऱ्याचशा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला तिन्ही मतदारसंघातील आपले लोकप्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी कडवा संघर्ष करावा लागणार आहे.
जिल्ह्यात सध्या भाजपाचे इचलकरंजी मतदारसंघात सुरेश हाळवणकर हे विधानसभा सदस्य आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्याबाबत हरकत उपस्थित केली असल्याने छाननीवेळी त्यांचा अर्ज टिकणार का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भाजपाला पर्यायी उमेदवाराचा शोध घ्यावा लागत असून त्यासाठी कसरत करावी लागत आहे. पक्षाला दुसरा मतदारसंघ मिळाला आहे तो कोल्हापूर दक्षिण. येथे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडीक यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य अमल महाडीक यांना उमेदवारी दिली आहे. महाडीक यांना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी टोकदार संघर्ष करावा लागणार आहे. शाहूवाडी, हातकणंगले, कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ या मतदारसंघात भाजपाकडे प्रबळ दावेदार नसल्याने स्वाभाविकच हे मतदारसंघ स्वाभिमानीकडे सोपविण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. तर हीच बाब स्वाभिमानीच्या पथ्यावर पडली असून ग्रामीण भागात मजबूत संघटन असलेल्या स्वाभिमानीला कधी नव्हे ते प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे.
शिवसेनेकडे राजेश क्षिरसागर-कोल्हापूर उत्तर, चंद्रदीप नरके-करवीर व डॉ. सुजित मिणचेकर-हातकणंगले असे तीन आमदार आहेत. या तिन्ही मतदारसंघांना शहरी तोंडावळा प्राप्त झालेला असल्याने तिघांनाही भाजपाची साथ सुटल्याचा ताप सहन करावा लागणार आहे. युतीत दुभंग निर्माण होण्यापूर्वी तिघांनाही लढती सोप्या वाटत होत्या. पण आता त्यांचे गणित अवघड बनले आहे. मत्री तुटल्याचा सर्वाधिक त्रास सेनेलाच होणार असे आत्ताचे चित्र आहे.