‘स्कायमेट’ संस्थेचा अंदाज

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) नियोजित वेळेपेक्षा सात दिवस आधीच केरळात पोहोचणार असला, तरी महाराष्ट्रात मात्र तो नियोजित वेळेनुसार ७ जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे. २५ मे रोजी केरळात दाखल झाल्यानंतर कर्नाटकपर्यंत मोसमी पावसाची वाटचाल झपाटय़ाने होईल. त्यानंतर त्याची वाटचाल काहीशी रखडून राज्यात तो नियोजित वेळेला पोहोचेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

केरळ ते कर्नाटकानंतर मोसमी पाऊस ७ जूनला दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात ९ जून, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात १२ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अंदमान-निकोबार बेटांवरही तो वेळापत्रकानुसार दाखल होणार असून तेथे २० मे रोजी मोसमी पावसाचे आगमन अपेक्षित असल्याचा अंदाजही स्कायमेटने दिला आहे. अंदमान येथे दाखल होणारी मोसमी पावसाची शाखा ईशान्य भारत, पूर्व भारत, उत्तर भारताच्या काही भागात पडणाऱ्या पावसासाठी कारणीभूत ठरते. केरळ येथून देशात दाखल होणाऱ्या मोसमी पावसाच्या शाखेमुळे कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रासह, राजस्थान आणि उर्वरित भारतात पाऊस पडतो.

शहरातील तापमानात घट

पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये सोमवारी घट झाली.  रविवारी ३९.४  अंश असलेले तापमान सोमवारी ३७.६ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे उकाडय़ातून काहीसा दिलासा मिळाला. रविवारच्या पूर्वमोसमी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.  सोमवारी सकाळी काही काळ अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर हवेतील बाष्पाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने पावसाची चिन्हे दिसत होती. पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि परिसरातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार असून, दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.