दुसऱ्या करोना लाटेत शहराइतकीच ग्रामीण भागात बाधितांची संख्या

पालघर : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सध्या जिल्ह्यमध्ये ९८७७ उपचाराधीन रुग्ण असून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांच्या संख्येच्या जवळपास तितक्या संख्येने ग्रामीण भागात आजाराचे संक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्याला लाटेतील मृत्युदर हा निम्मा  आहे.

मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधी दरम्यानच्या पहिल्या लाटेत पालघर जिल्ह्यत ४५ हजार २२८ करोना रुग्ण आढळले होते. त्यापैकी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २९ हजार ७९९ तर जिल्ह्यच्या उर्वरित भागात १५ हजार ४२९ रुग्ण संख्या होती. याच कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील ८९४ करोना मृतांसह जिल्ह्यत ११९८ करोना मृत्यू नोंदवण्यात आले होते.

१ फेब्रुवारीपासून नोंदवण्यात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महानगरपालिका क्षेत्रात ३४ हजार ७९ रुग्ण आढळले असून उर्वरित जिल्ह्यत २८ हजार १५३ असे एकंदरीत ६२ हजार २३२ करोना रुग्ण आहेत. जिल्ह्यतील दुसऱ्या लाटेतील मृतांची संख्या ७९५ वर पोहोचली असून महानगरपालिका क्षेत्रात ४१२ तर उर्वरित जिल्ह्यवर ३८३ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. करोना मृत्युदर दुसऱ्या लाटेत १.३ इतका मर्यादित राहिला असून पहिल्या लाटेदरम्यान हाच दर दुप्पट म्हणजे २.६ इतका नोंदवण्यात आला होता.

सद्यस्थितीत जिल्ह्यतील उपचाराधीन रुग्णांपैकी महानगरपालिका क्षेत्रात ६५२८ रुग्ण आहेत. याच बरोबरीने पालघर तालुक्यात १३९८, वसईच्या ग्रामीण भागात एक हजार आठ, डहाणू तालुक्यात ४५२ रुग्ण असून तलासरी तालुक्यात २१ तर विक्रमगड मध्ये २० रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जव्हार व मोखाडा या दोन्ही तालुक्यात सध्या करण्याचा एकही सक्रिय रुग्ण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उपचाराधीन रुग्णांपैकी २१७० रुग्ण गृह विलगीकरणात, ३३३ रुग्ण करोना काळजी केंद्रामध्ये दाखल आहेत. त्याबरोबरीने करोना उपचार केंद्रांमध्ये २३८, समर्पित करोना रुग्णालयात १९० तर पालघर जिल्ह्यबाहेर ४१८ रुग्ण उपचार घेत आहेत.

एका आठवडय़ात ५६ मृत्यू

गेल्या आठवडाभरात पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागातील मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. करोनामुळे गेल्या आठवडय़ात एकूण ५६ जणांचा मृत्यू झाला. जव्हार, मोखाडा व वाडा तालुक्यामध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवडय़ाभरात या तिन्ही तालुक्यांमध्ये ५३ जण दगावले आहेत. वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. आठवडय़ाभरात जव्हारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे. या मृतांची संख्या २६ इतकी आहे. त्यापाठोपाठ मोखाडा तालुक्यात १८ जणांचा, वाडा तालुक्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यातील मृतांची संख्या हळूहळू घटत आहे. गेल्या आठवडाभरात पालघर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर डहाणू तालुक्यात तीन जणांचा, वसई ग्रामीण भागात एक जणाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यत गेल्या २४ तासांत १८१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यत आतापर्यंत तीन हजार ३४९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत दुसऱ्या लाटेत आतापर्यंत आढळलेल्या ४३ हजार ५८२ रुग्णांपैकी ३९ हजार ५४६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ६८७ मृत्यूची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यच्या मृत्यूची टक्केवारी १. ५८ टक्के इतकी आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०. ७४ टक्के इतके आहे.