पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

जून महिना संपत आला तरी मोसमी पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून राज्यावर खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मोसमी पावसाचा देण्यात आलेला चांगला अंदाज आणि जूनच्या पहिल्याच आठवडय़ात सुरू झालेल्या पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागात खरिपाच्या पेरण्यांना जोरात सुरुवात झाली. पण थोडय़ाच दिवसात पावसाचा हा जोर ओसरला. गायब झालेल्या या पावसाने आता जून अखेरीपर्यंत पाठ फिरवल्याने राज्यातील बळीराजाभोवती पुन्हा चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.

यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ातच पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तरमहाराष्ट्र, विदर्भासह मराठवाडय़ात जोरदार पावसास सुरुवात झाली होती. यंदा पावसाचा अंदाज चांगला दिल्याने तसेच पावसाची सुरुवातही जोरात झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी होता. या पावसामुळेच सर्वच ठिकाणचे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले होते. या पाश्र्वभूमीवर गेले तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. ज्या भागात खरिपाची पेरणी झालेली आहे, तिथे पावसाअभावी पिकांची उगवण खुंटली आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यालगतच्या भागातील भात लागवडी खोळंबल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा मोठा भाग यंदा अद्याप कोरडाच आहे. उत्तर महाराष्ट्रात लांबलेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट ठाकले आहे. मराठवाडय़ातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत पण त्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भात यंदा पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पूर्व मोसमी पावसाचा आधार घेऊन झालेल्या पेरण्या आता धोक्यात आल्या आहेत.

कोकणात लावण्या रखडल्या

रत्नागिरी – कोकणात यंदा अपेक्षेएवढा पाऊस न झाल्यामुळे भातपिकाच्या लावण्या रखडल्या आहेत.  यंदा जूनच्या सुरुवातीच्या दिवसात उत्तम पाऊस पडल्याने बहुतेकांनी भात व इतर पिकांच्या पेरण्यांची कामे पूर्ण केली आहेत. भात रोपांची उगवणही चांगली झाली; मात्र पुढे लागवडीसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने या सर्व लागवडी रखडल्या आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ात १४ जूनपासूनच पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात जून महिन्यात सरासरी ९०० ते १ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. पण यंदा याच्या निम्माही पडलेला नाही. कोकणात मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात, रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या करण्याची परंपरा आहे. त्यानुसार काही भागांत पेरण्या झाल्या. काहींनी हवामानाचा अंदाज घेत नंतर पेरण्या केल्या आहेत. ३०-३१ मे रोजी उत्तम पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पेरण्या झाल्या. येत्या आठवडाभरात पावसाने जोर न पकडल्यास मात्र अडचण होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट

नाशिक – प्रारंभी काही भागात दमदार हजेरी लावणारा पाऊस नंतर अंतर्धान पावल्याने उत्तर महाराष्ट्रातील पेरण्यांचे समीकरण कोलमडले आहे. या भागात ६५ ते ७० टक्के क्षेत्रावरील पेरणी रखडली असताना धुळे व जळगाव जिल्ह्यात कापसासह अन्य पिकांची लागवड धोक्यात आली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाला करावे लागले. या स्थितीत शनिवारी काही भागात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे आशा पल्लवीत झाली आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने काही भागात हजेरी लावली. यामुळे बहुतांश भागात पेरणीची कामे सुरू झाली. मात्र पुढे पाऊस गायब झाल्याने त्या कामात अवरोध निर्माण झाला. ज्या ठिकाणी पेरणी झाली होती, तेथील पिके पावसाअभावी जळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ १४.३ टक्के पाऊस झाला. त्याचे प्रमाणही काही विशिष्ट तालुक्यांपुरते राहिले. यामुळे आतापर्यंत केवळ १९.५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून उर्वरित क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. उत्तर महाराष्ट्रातील इतर भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जळगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने सुमारे एक लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रफळावर पेरण्या पूर्ण झाल्या. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा आहे. त्या पाठोपाठ ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके आहेत. जूनअखेरीपर्यंत पाऊस न झाल्याने तब्बल पाच लाख हेक्टर क्षेत्रफळावर पेरण्या खोळंबल्या आहेत. एक लाखाहून अधिक क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आतापर्यंत झालेल्या पेरण्यांपैकी एक लाख २० हजार हेक्टरवरील पिके ही कोरडवाहू आहेत. ही पेरणी धोक्यात आली आहेत. जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, एरंडोल, भुसावळ आणि यावल तालुक्यात पिकांची अवस्था नाजूक आहे. कापसासह कडधान्य, तृणधान्य आदी धान्याची पेरणी जळण्याच्या स्थितीत आहे. धुळे जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली कापसाची लागवड धोक्यात आली आहे.

मराठवाडय़ात मोठय़ा पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद – मृग नक्षत्राला मराठवाडय़ाला पावसाला सुरुवात झाली. आतापर्यंत सरासरीच्या १५९.५ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. वार्षिक सरासरीची पावसाची टक्केवारी १८.९ एवढी आहे. त्यामुळे पेरण्या जवळपास पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ज्यांनी मृगनक्षत्रातील चांगल्या पावसानंतर पेरणी केली होती, त्यांच्या पिकांना मात्र आता ओढ जाणवत आहे. शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  मराठवाडय़ात औरंगाबाद जिल्ह्य़ात फुलंब्री, वैजापूर, कन्नड व औरंगाबाद या तालुक्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात पावसाची सरासरी ६७५ मि.मी. आहे. तुलनेने हिंगोली जिल्ह्य़ात मृगनक्षत्राच्या पहिल्या काही दिवसातच पडलेल्या पावसाने पुढे मात्र ओढ दिली आहे. परभणी जिल्ह्य़ाची सरासरी ७१४.६२ मि.मी. एवढी असून अपेक्षित सरासरीच्या १३३ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, या जिल्ह्य़ात पेरण्या लवकर झाल्याने पावसाची प्रतीक्षा आहे.

पश्चिम महाराष्ट्र कोरडा

सांगली – बळीराजाची यंदा मोसमी पावसाच्या पहिल्या नक्षत्राने निराशा केली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरसह नगर जिल्ह्य़ात जूनच्या सुरुवातीस झालेला पाऊस नंतर गायब झाल्याने झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत.  पुणे जिल्ह्य़ात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने चांगली हजेरी लावल्याने अनेक भागात पेरण्यांची धांदल उडाली. पण पुढे पावसाने ओढ दिल्याने या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम भागातील भात लागवडीही पावसाअभावी रखडल्या आहेत. सातारा जिल्ह्यात यंदा धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्यामध्ये सातत्य नाही. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचा जोर अल्प आहे. यामुळे धरणातील पाण्याची आवक अद्याप दिसत नाही. धोम, कण्हेरसह कोयना, वारणा या धरणातील पाणीसाठय़ातही अपेक्षित वाढ झालेली नाही. कोयना धरणात सर्वाधिक पाण्याची आवक होणाऱ्या नवजामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सांगली जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख ९१ हजार ६९३ हेक्टर आहे. मात्र यंदा पावसाअभावी केवळ १० टक्के म्हणजे २९ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यातही जिल्ह्य़ातील डोंगरी शिराळा तालुक्यात धुळवाफेवर भाताची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. पावसाचा जिल्हा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही यंदा अद्याप पावसाला जोर नाही. जिल्ह्य़ातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पावसाच्या उघडीपीमुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भूदरगड या पश्चिम घाटाकडील तालुक्यात भात लावण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. नगर जिल्ह्य़ात यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या सुमारे २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र या पावसात पुढे सातत्य न राहिल्याने या पेरण्या धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्य़ात मात्र यंदा पावसाने मोठी हजेरी लावली आहे. या पावसाच्या जोरावर जिल्ह्य़ातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

रायगडमध्ये भात धोक्यात

अलिबाग – रायगड जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ५१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अनियमित पावसामुळे रायगडातील भात पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टरवर खरीप हंगामात भात पिकाची लागवड केली जाते. या लागवडीसाठी सुरुवातीला जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केल्या जातात. जून महिन्यात पेरणी तर जुल महिन्यात लावणी केली जात असते. यावर्षी जवळपास ८० टक्के क्षेत्रासाठी पेरणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ७ हजार ४२८ हेक्टरवर रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. मात्र अनियमित पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ४७७ मिलीमिटर पावसाची नोंद होत असते. या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात आत्ता पर्यंत सरासरी २४२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच जून महिन्यातील पावसाच्या तुलनेत केवळ ५१ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.सध्या भात रोपांची परिस्थिती चांगली आहे. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्याने जमिनीतील आद्रता टिकून आहे. मात्र पावसाने अजून पाच ते सहा दिवस ओढ दिल्यास भात रोप करपण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत ऊन पडते आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भात पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान जमिनीतील ओलावा कमी झाल्यास भात रोपांना शेतकऱ्यांनी पाणी पुरवठाची व्यवस्था करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

विदर्भात पेरण्या विस्कळीत

नागपूर- विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा आधार घेऊन झालेल्या पेरण्या आता पावसाअभावी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.  शेतीच्या क्षेत्रात खरीप हंगामाला महत्त्वाचे स्थान असते. यंदा पाऊस चांगला आणि वेळेत येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली होती. पूर्वमोसमी पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण पुढे पावसाने पाठ फिरवल्याने त्या आता धोक्यात आल्या आहेत. बहुतांश क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. कृषी खात्याकडून प्राप्त माहितीनुसार विदर्भात सरासरी ७ ते १० टक्के पेरण्या झाल्या. अमरावती विभागात ७.१५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी ५ टक्के म्हणजे केवळ ३८ हजार ६०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.  बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्य़ात पूर्वमोसमी पाऊस झाल्याने तेथे पेरण्यांचे प्रमाण अमरावती, अकोला जिल्ह्य़ाच्या तुलनेत अधिक आहे. अकोला जिल्ह्य़ात केवळ चार टक्के पेरण्यांची नोंद आहे. अशीच स्थिती नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांची आहे. विभागात एकूण लागवड क्षेत्र २० लाख हेक्टरचे असून तेथे आतापर्यंत ७ ते १० टक्के पेरण्या झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्य़ात ०.३६ टक्के, नागपूर जिल्ह्य़ात ०.५९ टक्के पेरण्यांची नोंद आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्य़ातही प्रमाण कमीच आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकेने कर्ज देण्यास दिलेला नकार आणि त्यामुळे आलेली आर्थिक अडचण ही सुद्धा पेरण्या कमी होण्यास कारणीभूत आहे. विदर्भात येत्या आठवडय़ात समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामच धोक्यात येण्याची भीती आहे.