दुष्काळामध्ये लातूरकरांना रेल्वेने पाणी उपलब्ध करून देण्याचा पहिला चाचणी स्वरुपातील प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर मिरजेतून बुधवारी सकाळी आणखी पाच लाख लिटर पाणी घेऊन दुसरी ‘पाणी एक्स्प्रेस’ लातूरकडे रवाना झाली. ही गाडी बुधवारी रात्री लातूरला पोहोचण्याची शक्यता आहे. पहिल्या गाडीप्रमाणे या गाडीलाही दहा वाघिण्या असून, प्रत्येक वाघिणीमध्ये ५० हजार लिटर पाणी आहे. मिरजेमध्ये मंगळवार सकाळपासूनच या वाघिण्यांमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू होते.
पाणीटंचाईने मेटाकुटीला आलेल्या लातूरमध्ये तब्बल पाच लाख लिटर पाणी घेऊन आलेली पहिली विशेष रेल्वेगाडी मंगळवारी पहाटे पाच वाजता दाखल झाल्याने लातूरकरांचा जीव भांडय़ात पडला. मिरजेहून सोमवारी सकाळी ११ वाजता निघालेली ही गाडी लातूरला येताच स्थानकात लोकांच्या उत्साहाला उधाण आले तर राजकीय पक्षांनी या लाटेत श्रेय लाटण्याचीही केविलवाणी धडपड केली.
पाणी उतरवून घेत टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ते वाहून नेण्याची चाचणीही नियोजनाप्रमाणे यशस्वी झाल्याने राज्यातला हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. पाणीटंचाईमुळे लातूरकरांचा संताप अनावर होऊ लागताच सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मार्चला लातूर येथे सर्व मंत्र्यांसह घेतलेल्या बठकीनंतर लातूरला पाणीपुरवठय़ासाठी तातडीचे उपाय योजण्याची घोषणा केली. डोंगरगाव, माकणी, भंडारवाडी येथून टँकरद्वारे पाणी आणण्यासाठी आर्थिक तरतुदीसह सर्व प्रकारच्या प्रशासकीय मान्यता देऊ केल्या. त्यानुसार शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. या पाणीपुरवठय़ात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रेल्वेद्वारे पाणी आणण्याची ही योजना पुढे आली. आठवडाभरापूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेद्वारे पाणीपुरवठय़ासंदर्भात पाहणी केली व १५ दिवसांत लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची घोषणा केली होती.