|| दिगंबर शिंदे

सांगली : करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या उणिवा समोर येत असतानाच गेल्या आठ दिवसांत दररोज दीड हजारांच्या संख्येने वाढणाऱ्या रुग्ण संख्येने जिल्ह्याची परिस्थिती आरोग्यदृष्ट्या अराजकतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असेच चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जीवापाड प्रयत्नशील दिसत असले तरी उंबऱ्यावर करोनाचे भयावह संकट उभे असताना व्यवस्थेच्या शाब्दिक बुडबुड्यांनी अडलेला श्वास निरंतर होण्याची शक्यता कठीण बनत चालली आहे.

दुसरी लाट भयानक स्वरूप घेणार हे नागपूर, पुणे, मुंबईतील स्थितीवरून लक्षात आले होते. मात्र याकडे राजकीय नेतृत्वाने फारशा गांभीर्याने पाहिलेच नाही असे म्हणणे धाडसाचे असले तरी वास्तव आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतानाही भाजपने शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन केलेली आंदोलने, महापौर निवडीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या महापालिका प्रवेशाचा जोश अथवा भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी आयोजित केलेला लसीकरणासाठी बस देण्याचा कार्यक्रम. या गोष्टी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळता येण्यासारख्या होत्या. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. राजकीय लोकांना बंधनमुक्ती आणि सामान्यांच्या स्वैर विहारावर निर्बंध यामुळे करोना विस्ताराला हातभार लागला हे कटू सत्य मान्य करण्याचे धाडसही राजकीय नेतृत्वाच्या खुजेपणात दडले आहे.

आज जिल्ह्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी ४३ कोविड उपचार केंद्रे आणि ३१ करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. क्रियाशील रुग्णांची संख्या आता १४ हजार १०२ वर पोहोचली आहे. या तुलनेत वैद्यकीय सुविधा देण्यास यंत्रणा सक्षम तर नाहीच, पण खासगी रुग्णालयांची यंत्रणाही तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी प्राणवायू उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णालयांनी खाटा असूनही रुग्णांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. ज्यांच्याकडे पैसा आणि वशिला आहे अशांना मात्र तात्काळ खाट उपलब्ध होत आहे. ही विसंगती का, असा प्रश्न व्यवस्थेला विचारणे म्हणजे डोके आपटून घेण्यातला प्रकार आहे. विविध रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या सांगण्यासाठी डिजिटल माहिती स्रोत उपलब्ध करून देण्यात आला असला तरी यावरील माहिती अद्ययावत असेलच याची खात्री देता येत नाही. या माहितीच्या आधारावर एखादा रुग्ण इस्पितळात गेला तर अनामत पोटी दीड-दोन लाखांची मागणी केली जाते तेही कोणत्या तरी राजकीय नेत्यांने सांगितले, तर अन्यथा, दुसऱ्या इस्पितळात हलविण्याचा फुकटाचा सल्ला दिला जातो.जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसाय अख्ख्या महाराष्ट्रात नावाजलेला. दीड शतकापासून अत्याधुनिक व खात्रीशीर इलाजासाठी मिरजेचे नाव घेतले जाते. आजही अनेक आजारावरील तज्ज्ञ आणि जालीम उपाय करणारे धन्वंतरी आहेत. मात्र करोना संकटाची संधी शोधून काही वैद्यकांनी धंदाही सेवेचा धंदा सुरू केला आहे. खुद्द शासकीय करोना रुग्णालयात रुग्णांसाठी शासनाने दिलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार दक्ष पोलिसांच्यामुळे उघडकीस आला. आता या काळाबाजाराचे धागेदोरे उघडकीस येऊ नयेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा पाठीशी उभी करण्याची किमया यातील धुरिणांनी साधली आहे. याचबरोबर एका बहुविध उपचारासाठी नव्यानेच उघडलेल्या रुग्णालयातील कर्मचारी बोगस करोना चाचणी अहवाल देत असताना पोलीसांच्या तावडीत सापडला. अशा किती तरी घटना रोज घडत आहेत. दुसऱ्या बाजूला गरजू रुग्ण खाट मिळेल, का प्राणवायू मिळेल का यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे मारत आहे. वैद्यकीय परंपरेला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचण्याची गरज आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्तीही महत्त्वाची आहे.

आठ दिवसांत प्राणवायूसाठी नवीन प्रकल्प उभा करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी करून १५ दिवसांचा अवधी सरला. मात्र आजही हा प्रकल्प उभारला गेला नाही. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी नऊ प्राणवायू प्रकल्प उभे करण्यात येत असल्याचे माध्यमांना सांगितले जात आहे, मात्र प्रत्यक्षात मात्र बोरी, पुणे, कोल्हापूर येथील प्राणवायूचा टँकर कधी येतो याची प्रतीक्षा करावी लागत आहे. हीच स्थिती लसीकरणाची आहे. चार चार दिवस जिल्ह्याला लससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. चार दिवसांनी मिळणारी लस केवळ एका दिवसात संपते, पुन्हा प्रतीक्षा असल्याने लसीकरणाचे लक्ष्य कसे गाठणार, हाही प्रश्नच आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागात जोर होता, या वेळी गावखेड्यापर्यंत आजार पसरला आहे. आठ-दहा हजार लोकसंख्येच्या गावात शेकड्यांनी रुग्ण आहेत. आता हा संसर्ग रोखण्यासाठी केवळ लाट ओसरण्याचीच वाट पाहावी लागणार आहे. हाताबाहेर स्थिती गेल्यातच जमा आहे. यातून कमीत कमी हानी कशी होईल हे पाहणेच आता सामान्यांच्या हाती उरले आहे.

जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक क्रियाशील रुग्ण असणारी तालुकानिहाय गावे व कंसात रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे…

आटपाडी – आटपाडी (७८८), दिघंची (१८५), शेटळे (१०१), निंबवडे (८३).

जत – शेगाव (८२), कोनीकुन्नुर (७७), बिळूर (१३१), डळापूर (७२), जत नगरपालिका (३५६).

तासगाव – चिंचणी (५६),  कुठे (७०), बोरगाव (६८), राजापूर (८८), तासगाव नगरपालिका (१६५).

रिज – आरग (१६०), बेडग (१५६), कवठेपिरान (५३),  म्हैशाळ (८०).

वाळवा – वाळवा (१०१), बोरगाव (७०), साखराळे (५०), कोरी (६६). पलूस नगर परिषद (१८१), कुंडल (८०).

कडेगांव – वांगी (५९), कडेगाव नगरपंचायत (९९), येतगाव (५४). खानापूर नगरपंचायत (७३), बलवडी (५१), पळशी (६२), लेंगरे (६२).

कवठेमहांकाळ नगरपंचायत (८७), नागज (७०). शिराळा नगरपंचायत (६८)