घुबडांची प्रजाती त्यांची मान रक्तप्रवाह खंडित न होता २७० अंशाच्या कोनात कशी वळवू शकते, याचे रहस्य अमेरिकेतील संशोधकांनी उलगडल्याचा दावा  नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून करण्यात आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून हा निष्कर्ष नुकताच जाहीर केला. घुबड ही एकमेव पक्षाप्रजाती स्वत:ची मान कोणत्याही दिशेला २७० अंशाच्या कोनात वळवू शकते, याचे रहस्य उलगडण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनाला आता यश आल्याचे जगप्रसिद्ध न्युरोरेडिओलॉजिस्ट फिलिप गेलाऊड यांनी इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
 घुबडाने २७० अंश कोनात मान वळविल्यानंतरही त्याच्या मानेतील आणि डोक्यातील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचत नाही तसेच त्याच्या मेंदूला होणारा रक्तप्रवाहदेखील थांबत नाही, हॉपकिन्स विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी यावर कठोर संशोधन केले. जगभरात हजारोंच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या घुबडांच्या प्रजातीला निसर्गाने दिलेली ही अत्यंत आश्चर्यकारक देणगी आहे. घुबडांचा अपवाद वगळता जगातील कोणताही मनुष्यप्राणी, पशु वा पक्षी २७० अंशाच्या कोनात मान वळवू शकत नाही. मेंदूशास्त्र संशोधकांनी हे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रजातीच्या घुबडांच्या मस्तकातील आणि मानेतील हाडे तसेच रक्तवाहिन्यांचे अत्यंत सूक्ष्म संशोधन केले. घुबडांच्या नैसर्गिक मृत्यूनंतर हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला. त्याची क्ष किरण छायाचित्रे घेण्यात आली. घुबडांच्या रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे ‘डाय’ सोडून रक्तप्रवाहावर होणार परिणाम तपासण्यात आला तसेच घुबडाची मान मानवी प्रयत्नाने वळविण्यात आली.
घुबडाच्या मस्तकाखाली असलेल्या रक्तवाहिन्या, जबडय़ाखालील हाडे जास्तीत जास्त आकुंचन पावत असल्याचे या संशोधनात आढळून आले. या राखीव रक्तवाहिन्यांमधून घुबडांना मान कितीही अंशाच्या कोनात वळविल्यानंतरही मेंदू, मान आणि डोळ्यांना रक्तपुरवठा केला जात असल्याने त्यांची ऊर्जा कायम राहते, रक्तप्रवाह खंडित होत नाही आणि घुबड २७० अंश कोनापर्यंत मान वळवू शकते, असा निकष संशोधकांनी काढला आहे. गेल्या १ फेब्रुवारीच्या विज्ञान नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.