परस्परसंमतीने ठेवले जाणारे समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. अन् या निर्णयाची गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या निष्ठा निशांतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कदाचित आपल्यासारख्या लोकांना याचं फारसं अप्रूप नसावं, ज्यांना LGBTQ+ समाजाचा तिरस्कार वाटतो अशांनाही या निर्णयाचं कौतुक नसेल. मात्र निष्ठासारख्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीसाठी याचं मोल खूप आहे.

‘आपल्या समाजात, त्यातूनही अनेक मराठी कुटुंबात अजूनही LGBTQ+ समाजाविषयी अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच लोकांच्या मनात गैरसमज वाढतात आणि माणूस या नात्यानं इतरांना वागवणं आपण विसरून जातो.’ असं निष्ठा सांगत होती. २६ वर्षांच्या निशांतचा ‘निष्ठा निशांत’ होण्यापर्यंतचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. ‘ट्रान्सवुमन’ अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या निष्ठानं तिच्या प्रवासात अनेक नाती गमावली होती. ‘आज आपण अशा समाजाविषयी खुलेपणानं बोलत आहोत. समाजात बदल घडवत आहेत. हि देखील मोठी गोष्ट आहे याचं समाधान तिनं व्यक्त केलं.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

लहानपणापासून तिच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. ती इतर मुलांपेक्षा आपण वेगळं आहोत हे तिलाही समजत होतं. अल्लड मन मुलींसोबत खेळण्याचा हट्ट करत होतं, मात्र प्रत्येकवेळी इतरांच्या चिडवण्यामुळे तिच्या अल्लड मनाला यातनाही तितक्याच सहन कराव्या लागत होत्या. एकदिवस मात्र तिचे बाबा मदतीला धावून आले. ‘बाबांनी मला हिणवणाऱ्यांच्या थोबाडीत मारली त्या दिवसापासून मुलांचं चिडवणं बंद झालं’, असं म्हणत निष्ठांनं खूप जुनी आठवण सांगितली.

निष्ठा संशोधक आहे. सध्या ‘प्लान्ट केमिस्ट्री’मध्ये ती अधिक संशोधन करत आहे. ती शिक्षिकाही आहे. ती अस्खलित इंग्रजी बोलते. साडी नेसून अगदी खुलेपणानं वावरते. आजही लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तोच आहे. तो बदलण्याची तिची धडपड मात्र नेहमीच सुरू असते. लहान वयात बाबांचा आधार होता मात्र कॉलेजमध्ये गेल्यानंतर पावलोपावली सहन करावा लागणारा भेदभाव आणि आव्हानही होतं. यातून नैराश्य आलं पण, किती काळ लोकांना घाबरून स्वत:ची ओळख लपवून ठेवायची? हा प्रश्न सारखा तिच्या मनाला छळत होता. अखेर आपण जसे आहोत तसंच आणि अगदी मनमुराद जगण्याचा निर्णय तिनं घेतला. निशांतपासून निष्ठा होण्याच्या प्रवासाचा पहिला टप्पा तिनं जिंकला होता.

‘मराठी कुटुंबात आजही लैंगिक शिक्षण किंवा अशा विषयावर खुलेपणानं बोललं जात नाही, त्यामुळे मलाही सुरुवातीला खूप अवघड गेलं. पण आपण याविषयी गैरसमज दूर करून सज्ञान झालं पाहिजे’, असं ती पुढे सांगत होती. पहिल्यांदा तिनं आपली घुसमट तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान भावासमोर बोलून दाखवली. कोणासमोर तरी आपण व्यक्त झालोत तसेच कुटुंबातल्या एका व्यक्तीला आपण LGBTQ+ समाजाबद्दल सज्ञान केलं याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. प्रत्येक कुटुंबानं आपल्या मुलाला याबदद्ल माहिती दिली तर समाजात माझ्यासारख्या अनेक लोकांचं वावरणं सोप्प जाईल’ निष्ठा कळकळीनं सांगत होती.

गुण, कला, बुद्धी, हुशारी सारं काही पदरात असताना केवळ ‘ट्रान्सवुमन’ म्हणून वावरत असल्यानं कामाच्या ठिकाणी अनेकदा संधी नाकारल्या गेल्या याची खंत तिला आजही बोचते. आठ हजार पगारापासून तिची सुरूवात झाली, हुशारी असतानाही केवळ समाजाच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे तिला बरंच काही सहन करावं लागलं. पण इथही तिनं माघार घेतली नाही. स्वत:च्या करिअरची नव्यानं सुरूवात केली.

आजही मराठी कुटुंबात LGBTQ समाजाविषयी गैरसमज आहेत. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबात अशी मुलं जन्मतात पण घरच्यांच्या किंवा समाजाच्या भीतीमुळे नेहमी स्वत:चं मनं मारून जगतात. त्यातून अनेकांना नैराश्य येतं, काहींच पाऊल अगदी आत्महत्येपर्यंत वळतं, अशा अनेक मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ती करते. आपल्याला पावलोपावली हीन वागणूक मिळाली पण हेच दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये हाच तिचा सदैव प्रयत्न असतो. समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, हा निर्णय तिच्यासाठी नक्कीच मोठा आहे. अजूनही अनेक बदल घडायचे आहेत, या बदलांची तिला प्रतीक्षा आहे, मात्र समाजाचे अनेक गैरसमज दूर व्हावे आणि समाजानं आपल्याला स्वीकारावं इतकीच माफक अपेक्षा तिची आहे.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com