लोकसत्ता खास प्रतिनिधी
औरंगाबाद: दौलताबादच्या किल्ल्यावर नेहमीचा मुक्काम असणाऱ्या माकडांच्या खाण्यापिण्याच्या सोय येथील सुरक्षा रक्षकांनी केली आहे. खुलताबाद येथील नागरिक या माकडांसाठी पोळी- भाकरी करुन देत आहेत. तर काही व्यापारी बिस्कीटचे पुडे देत आहेत. मधुकर पवार नावाच्या व्यापाऱ्याने ५० किलो शेंगादाणे दिल्याने काही प्रमाणात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला असल्याची माहिती सुरक्षारक्षक महेंद्र जोशी यांनी दिली.

दौलताबादचा किल्ला १७ मार्च रोजी पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. या किल्ल्यात अनेक माकडांचा वावर आहे. एवढे दिवस पर्यटक येत असत. त्यांनी दिलेल्या खाद्यापदार्थावर ते जगत. काही वेळा अन्नपदार्थ ओढूनही घेत. मात्र, किल्ला बंद झाला आणि त्यांचे हाल सुरू झाले. सुरक्षारक्षक म्हणून महेंद्र जोशी रोज किल्ल्यावर जातात. त्यांना व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना माकडाने एकेदिवशी जेऊ नाही. शेवटी गावात गेल्यानंतर त्यांनी गल्लीतील तरुणांना ही स्थिती समजावून सांगितली. मग गावातील काही तरुणांनी पोळया- भाकरी गोळा करण्याचे ठरवले.

ही मदत दररोज होत नसल्याचे एका व्यापाऱ्याला समजले. ते आता रोज बिस्कीटाचे एक खोके देतात. काही जणांनी चार वेळा केळीही दिली. एका व्यापाऱ्याने शेंगादाणे दिले. आता ही माकडे उपाशी राहात नाहीत. सुरक्षा रक्षक त्यांना काही तरी खायला आणतात म्हणून रोज हे त्यांच्या भोवती गोळा होतात. दौलताबादचा किल्ला पर्यटकांसाठी कधी सुरू होईल. तेथे पर्यटक येतील का,अशा अनेक शंका करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाल्या आहेत. मात्र, प्रत्येक जीवाला जगवणं महत्वाचेअसते आणि हेच काम महेंद्र जोशी नेटाने करत आहेत.