आंबोली घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने लोक सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. गेली चार वर्षे घाटात दरड कोसळत असूनही यंदा नेट बसविण्यास विलंब लावण्यात आला. दरम्यान, आज आंबोलीत मोठे दगड बससमोर पडले. सुदैवाने दगड बसवर पडले नसल्याचे सांगण्यात आले.
आंबोली घाटात पावसाचे आगमन झाल्यापासून दरडीचे दगड खाली येत आहेत. दरड भागात सुरुंग स्फोटाने हादरलेले अलगद असणारे दगड रस्त्यावर येत असावे, असे सांगण्यात येते. आज दगड बसवर पडल्याची चर्चा होती, पण दगड रस्त्यावर आल्याचे सांगण्यात आले.
आंबोली घाटाच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने हलगर्जीपणा केल्याचे बोलले जात आहे. दरड व दगड रस्त्यावर येऊ नये म्हणून कोटय़वधी रुपयांचे नेट (जाळी)चे कंत्राट देण्यात आले, पण हंगाम सुरू होऊनही नेट बसविली गेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आंबोली पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे वेगाने वाहताना त्यात आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने घाटाच्या सुरक्षिततेची कामे उशिरा हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.