मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारनं विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात आली आहे. राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शंका उपस्थित केली आहे.
भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीसाठी लोणावळ्यात आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविषयी रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले,”राज्य सरकार ज्या भावनेनं काम करत आहे. वागत आहे. त्याचा उद्देश काय आहे, हे मला माहित नाही. त्यांनी अनेकांची सुरक्षा (सिक्युरिटी) काढून घेतली आहे. आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचं संरक्षण पोलीस करतात असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातील जनता करतेय. सुरक्षा हटवल्याने आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ, असं नाही. सुरक्षा हटवण्याच कारण त्यांनाच माहिती आहे,” असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.
‘हे तर सूडाचे राजकारण’
ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे,” असं म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलं. “हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. करोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. कालही भंडारा येथे तेच पोहोचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीचे राजकारण,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 2:40 pm