तटरक्षक दलाच्या ३६व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत किनारा सुरक्षा सप्ताह साजरा केला जात असून, येत्या १० फेब्रुवारीपर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
रत्नागिरी येथील तटरक्षक दलाचे कमांडंट बी.एच. कुंभारे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, कोकण किनारपट्टीवर मोठे केंद्र विकसित होणार असून, कोकणाच्या सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्याचे संरक्षण या केंद्राद्वारे केले जाणार आहे. किनारपट्टीवरील गावांमध्ये त्यादृष्टीने आवश्यक जागृती करण्याची मोहीम दलातर्फे हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी तटरक्षक दलाच्या ताब्यातील विमानतळ परिसराला भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये तेथील सेवा-सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने येत्या ८ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा होणार असून, ९ फेब्रुवारी रोजी तटरक्षक दलाचे जहाज रत्नागिरीकरांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. भगवती बंदर येथील या जहाजावर किनारी सुरक्षेच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती नाविक अधिकारी देणार आहेत.
या विविध कार्यक्रमांचा समारोप १० फेब्रुवारी रोजी होणार असून, त्या दिवशी तटरक्षक दलाचे जवान प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.