एकाच पक्षात आणि एकाच जिल्ह्य़ात राहूनही एकमेकांशी फारसे सख्य नसलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे ‘सेल्फी’ प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीला धावून आले आहेत. महाजन यांनी पाण्यात बुडणाऱ्या अनेकांचे जीव वाचवले. ते सतत तीन दिवस पाण्यात होते. त्याकडे कोणी लक्ष न दिल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाताना बोटीवर काढलेल्या सेल्फीत महाजन हे हसताना दिसतात. त्यांच्या या सेल्फीवर विरोधकांसह सर्वानीच टीकास्त्र सोडले. अशा वेळी खडसे यांनी महाजन यांची पाचोरा येथील कार्यक्रमात पाठराखण केली. राजकीय क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीने कितीही चांगले काम केले असले तरी त्या कामास जितकी प्रसिद्धी मिळत नाही, त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी त्या व्यक्तीकडून झालेल्या एका चुकीला मिळते. अशाच प्रकारे एका सेल्फीचे फळ सध्या गिरीश महाजन हे अनुभवत आहेत. वास्तविक महाजन यांनी पाण्यात बुडणाऱ्या अनेकांचे जीव वाचवले. ते सतत तीन दिवस पाण्यात होते. त्यास प्रसिद्धी न देता त्यांच्या एका सेल्फीवर टीका करण्यात आली. चांगल्या गोष्टींचेही कौतुक झाले पाहिजे.