मृगानंतर आद्र्रा नक्षत्रही कोरडेच गेल्याने जिल्ह्य़ात पावसाअभावी खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत केवळ २५.३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जिल्ह्याचे खरीप पेरणी क्षेत्र ३ लाख ९० हजार ५०० हेक्टर आहे. यात उस्मानाबाद तालुक्याचे क्षेत्र ७३ हजार ५००, तुळजापूर ७७ हजार ३००, परंडा २२ हजार ७००, भूम ३० हजार ४००, वाशी २७ हजार, कळंब ६८ हजार, उमरगा ७० हजार २०० तर लोहारा २१ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होऊन पेरण्या वेळेवर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मृग नक्षत्र कोरडेठाक गेलेच, परंतु आद्र्रानेही हिरमोड केला. पेरण्या मार्गी लागण्यासाठी आता पुनर्वसूमध्ये तरी पाऊस होणे गरजेचे ठरले आहे. यंदा पेरण्यांची टक्केवारी अवघी ०.६ आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात आतापर्यंत ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. सध्या जिल्ह्यातील प्रस्तावित क्षेत्रापकी अवघ्या २५.३८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पावणेचार हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्यांसाठी पावसाची आवश्यकता आहे. मागील दुष्काळी स्थितीला तोंड देत यंदा बी-बियाणे, खतांची खरेदी शेतकऱ्यांनी केली. उसनवारी, उधारीच्या मार्गाने खरेदी केलेले बी-बियाणे, खते पडून आहेत. लवकरात लवकर पाऊस होण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल घरगुती बियाणे वापराकडे अधिक असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात यंदा २४ हजार १८७ क्विंटल बियाणे व २८ हजार ७९६ मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.