वाढीव दरानेच महाबीजच्या बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच शासनाचा ‘तो’ आदेश महाबीजच्या मुख्यालयात धडकला आहे, त्यामुळे महाबीज बियाण्यांची मागील वर्षीच्याच दराने विक्री करण्याचा आदेश महाबीजने विक्रेत्यांना दिला. शेतकऱ्यांनी वाढीव दराने खरेदी केलेल्या बियाण्यांच्या फरकाचा परतावाही त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने बियाण्यांची केलेली दरवाढ मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रद्द केल्यानंतरही गेल्या चार दिवसांपासून वाढीव दरानेच बियाण्यांची विक्री सुरू होती. शासनाने बियाणे दरवाढीला स्थगिती दिल्याच्या निर्णयाचा कुठलाही आदेश महाबीजला प्राप्त झालेला नव्हता. दरवाढ स्थगितीबाबत संभ्रमावस्था होती. याचे वृत्त प्रसिद्ध होताच पूर्वीच्याच दराने बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदा दुष्काळ आणि नापिकीच्या पाश्र्वभूमीवर महाबीजने बियाण्यांची दरवाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. खरिपातील पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याची तक्रारही होती, त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवताना इतर मंत्र्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने बियाण्यांच्या दरवाढीस स्थगिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा आदेश मात्र शुक्रवापर्यंत येथील महाबीजच्या मुख्यालयात पोहोचलेलाच नव्हता. वाढीव दरानेच बियाण विक्री सुरू होती. अखेर शनिवारी रात्री शासनाचा आदेश पोहोचल्यावर महाबीजने तात्काळ आदेश काढून पूर्वीच्याच दराने बियाणे विकण्याचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत, त्यामुळे रविवारपासून मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्री सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता वाढीव दराने विकलेल्या बियाण्यांच्या रकमेचा परतावा करण्याचा प्रश्नावरही शासनाने तोडगा काढला असून शेतकऱ्यांनी वाढीव दराने खरेदी केलेल्या बियाण्यांची पावती व कृषी सहायकांचा शेरा सादर केल्यावर त्यांच्या बॅँक खात्यात बियाण्यांच्या रकमेच्या फरकाचा परतावा जमा होणार आहे.

विक्री पूर्वीच्याच दराने -रामचंद्र नाके
बियाणे दरवाढ शासनाने रद्द केल्याचा आदेश प्राप्त झाल्यामुळे दरवाढ रद्द करण्यासंदर्भात महाबीजनेही विक्रेत्यांना पूर्वीच्याच दराने बियाणे विक्री करण्याचे आदेश दिल्याची माहिती विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली.