कुकडीतून ओव्हरफ्लोचे सोडलेले पाणी रविवारी सकाळी अचानक बंद करण्यात आले. कर्जत तालुक्यातील करपाडी येथे आज कसे तरी पाणी पोहोचले, मात्र शेतकऱ्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. येथे पाणी पोहोचेपर्यंत ते बंद करण्यात आले. याही आवर्तनात सीना धरणात पुरेसे पाणी आले नाहीच.
कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे पुणे जिल्हय़ात आहेत व ती बहुतांशी भरली आहेत. या परिसरात पाऊस सुरू झाला, की ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात येते. या वेळी सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. धरणाची क्षमता २ हजार ४०० दशलक्ष घनफूट आहे. धरणात अवघा ८२५ दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. यातील २७२ दशलक्ष घनफूट हा मृत साठा आहे. सीना धरणात आवर्तन सोडल्याचे जाहीर झाले, त्यात २४ तासांमध्ये अवघे ४५ दशलक्ष घनफूट पाणी येत होते. उर्वरित सर्व पाणी करमाळा तालुक्यात गेले. करमाळा तालुक्यातील सर्व तलाव भरलेले असताना विनाकारण पाणी सोडण्यात आले. कर्जत तालुक्यातील सीना धरण या वेळी संपूर्ण भरून देणे गरजेचे होते. याशिवाय तालुक्यातील राशिन भागातील करपडी, परीटवाडी, काळेवाडी या परिसरात कुकडीचे पाणी सोडण्याची गरज होती, मात्र पोलीस बंदोबस्तात कसेबसे करपडीपर्यंत पाणी पोहोचले व लगेचच बंदही झाले.