बेकायदा दारू वाहतूक करणारी मालमोटार उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी सापळा रचून पकडली. बाटल्यांवरील किमतीनुसार ४० लाखांच्या दारूसह सुमारे ६३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र बाजारभावानुसार या दारूची किंमत कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यांतील अशी तिसरी घटना असून यामागे मोठे रॅकेट असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिक-पुणे मार्गावरून बेकायदा दारू वाहतूक करणारी मालमोटार जात असल्याची खबर दारूबंदी विभागाला मिळाली होती. त्याआधारे सापळा लावण्यात आला होता. याच मार्गावरील हिवरगाव पावसा फाटय़ावर संबंधित संशयित मोटार आल्यानंतर तपासणीसाठी थांबविण्यात आली. त्यामध्ये दडवून ठेवलेली दारूची खोकी दिसल्यानंतर पोलिसांनी मोटार ताब्यात घेत येथील कार्यालयात आणली. या विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. बी. चव्हाण, उपनिरीक्षक तोत्रे व व्ही. टी. व्यवहारे, िहमत जाधव, सुधीर नगरे, राजगुरू यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायंकाळपर्यंत दारूच्या खोक्यांची मोजदाद चालू होती. अखेरीस त्यात वेगवेगळय़ा बनावटीची ८९९ खोकी आढळून आली. त्यात सिग्नेचर, ब्लेंडर्स प्राईड, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल अशा महागडय़ा बँडसह इतर बनावटीची दारू सापडली. संबंधित दारू पंजाबमध्ये तयार करण्यात आली असून त्याच राज्यात विक्रीसाठी असल्याचे खोक्यावर नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी ही दारू बनावट असण्याचीही शक्यता व्यक्त होते. बाटल्यांवर छापलेल्या किमतीनुसार एकूण किंमत ४० लाखांच्या घरात जाते. मात्र मद्यविक्रेते छापील किमतीपेक्षा कितीतरी अधिक किमतीने बाटल्या विकतात. त्यामुळे दारूची बाजारभावानुसार किंमत कोटीच्या घरात जाते. या प्रकरणी मोटारचालक दलबीरसिंह सहोता (रा. छत्तीसगड ) व ऋषिश्वर कान्हेकर (वय ४०, रा. लाखणी, जि. भंडारा) यांनी ताब्यात घेण्यात आले आहे.