करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचलित दर्शना स्वयंसहायता महिला बचत गट तसेच वैशाली गृह उद्योग यांनी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन तसेच वॉटर कुलर व फिल्टर मशीन मदत दिली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात रेहाना अजिन तुरक व वैशाली वसंत पाटील या कोविड चाचणी करायला गेल्या असता, त्यांच्या निदर्शनास आले की, कोविड केअर सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर व ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीनची आवश्यकता आहे. याबाबत त्यांनी गटातील महिलांशी चर्चा करून दोन्ही वस्तू रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्याची इच्छा दर्शवली. गटातील सर्व महिलांनी लगेच होकार दिला आणि ७० हजार रुपयाचे ऑक्सिजन मशीन व तीस हजार रुपयाचे वॉटर कुलर रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आलं.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी केलेल्या मदतीबद्दल महिला बचत गटांचे आभार मानले. यावेळी दर्शना स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव वैशाली पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. “करोनाच्या काळात समाजाला मदतीची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावं. समाजातील बरेच लोक आर्थिक क्षमता असून, देखील मदतीचा हात पुढे करत नाही. अशांनी जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी. भविष्यात अशा पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्याची इच्छा आहे,” असं त्या म्हणाल्या.