सिंधुदुर्ग नगरीत सुरू असणारे डम्पर व्यावसायिकांचे आंदोलन ९ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे, तसेच येत्या २१ मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकाविरोधात आम. नितेश राणे हक्कभंग आणणार आहे, असे राणे म्हणाले. दरम्यान शिवसेना-भाजपने या आंदोलनातून आज माघार घेतली. त्यामुळे यापुढे सुरू राहणारे आंदोलन सर्वपक्षीय नसून काँग्रेस पक्षाचेच असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची उशिरा भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांना अपमानित केल्याने सरकारी डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला असून उद्या मंगळवारी काळ्या फिती लावून मॅग्मो संघटनेचे सदस्य निदर्शने करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी डम्पर व्यावसायिकांच्या प्रश्नावर सन्माननीय तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असल्याने शिवसेना-भाजपने डम्पर व्यावसायिकांच्या आंदोलनातून माघार घेतली आहे. नारायण राणे यांनी स्टंटबाजी सुरू केली असून पुत्रप्रेमापोटी ते टीका करत असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.

कणकवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख आम. वैभव नाईक, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला. जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या विरोधात येत्या अधिवेशनात आमदार नितेश राणे हक्कभंग आणतील, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. आमदार नितेश राणेंना जिल्हाधिकारी यांनी भेटायला बोलाविले होते, त्यांनी भेटण्यास जाताना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली हेही सुटले नव्हते असे राणे म्हणाले. डम्पर व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याची शिवसेना-भाजपत धमक नाही. हे आंदोलन ९ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, येत्या २१ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस भव्य मोर्चा काढणार आहे असे नारायण राणे म्हणाले. महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आपण चर्चा केली असून, गौण खनिज प्रश्न मार्गी लावण्याचे मान्य केले. डम्पर व्यावसायिकांचा प्रश्न मीच सोडवू शकतो. खासदार, पालकमंत्री व शिवसेनेच्या आमदारांत धमक नाही. त्यांना आता पराभूत करून घरी पाठविणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला.

शिवसेना-भाजपच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास नाही. खासदार विनायक राऊत ताकदीपेक्षा जास्त बोलत आहे. त्याने लोकसभेत प्रश्न मांडावा, असेही राणे यांनी सुचविले.