News Flash

“…तर केंद्र सरकार दाऊदलाही वाय कॅटेगरीची सुरक्षा देईल”

कंगना रणौतला केंद्र सरकारने दिली वाय दर्जाची सुरक्षा

प्रातिनिधिक फोटो

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाल्यानंतर विरोध करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुनच शिवसेनेने आता केंद्रावर निशाणा साधत महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र अंडर वर्ल्ड डॉन डाऊद इब्राहिमलाही वाय दर्जाची सुरक्षा देईल असं म्हटलं आहे.

अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र सरकार हे सर्व करत असल्याचं म्हटलं आहे. “उद्या महाराष्ट्र सरकारने किंवा एखाद्या मंत्र्याने दाऊदविरोधात वक्तव्य केलं तर केंद्र सरकार दाऊदलाही एक्स किंवा वाय दर्जाची सुरक्षा देईल. महाराष्ट्र सरकारला विरोध करणं एवढंच त्यांच धोरण आहे,” अशा शब्दांमध्ये सरनाईक यांनी कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला.

“महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला खूपच प्रेम असल्याचे दिसून येत आहे. महिला आयोगाला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटनांची दखल घेता येत नाही,” असा टोलाही सरनाईक यांनी लगावला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार या सरनाईक यांच्या वक्तव्यावरुन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हा टोला लगावला आहे. आज मुंबईमध्ये अनेक पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही ते आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. असं असतानाही त्यांच्यावर विश्वास नाही असं म्हटलं जात असेल तर ते योग्य नाही, असं मतही सरनाईक यांनी व्यक्त केलं.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगनाविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे सरनाईक यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर अध्यक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सरनाईक यांनी दिली. ‘मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे,” असं या पत्राचा फोटो ट्विट करत सरनाईक यांनी म्हटलं होतं.

पत्रात काय म्हटलं आहे

सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “अभिनेत्री कंगना रणौत यांनी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मिरशी केलेली असून मुंबई पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईत राहणे धोक्याचे आहे अशा पद्धतीचे ट्विट केले होते. त्याचबरोबर काही लोकांच्या प्रतिक्रियेनंतर परत मुंबईची तुलना तालिबानबरोबर करण्याबाबतही टि्वट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये व प्रामुख्याने मुंबईमध्ये विविध राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी आपली प्रतिक्रिया देऊन कंगना राणौत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, परंतू अद्यापपपर्यंत कंगना राणौत यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली नाही.”

“कंगनाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ट्विट करुन अनेक कलाकारांवर अंमलीपदार्थ सेवनप्रकरणी आरोप केलेले आहेत. तसेच काही कलाकारांनी देखील कंगना यांच्यावर अंमली पदार्थ सेवनाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे या सभागृहातील सर्व सदस्यांनी या घटनेची तीव्र निंदा करुन सर्वानुमते कंगना रणौवत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पारीत करावा”, असे सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 9:44 am

Web Title: sena mla pratap sarnaik dawood jibe at centre over kangana ranaut y plus security scsg 91
Next Stories
1 संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; प्रियांका चतुर्वेदींसह १० जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती
2 “आम्ही विचार केला त्यापेक्षा अधिकच नॉटी आहेत”; अमृता फडणवीसांचा राऊतांना अप्रत्यक्षरित्या टोला
3 एकनाथ खडसे यांनी सोडलं मौन, थेट देवेंद्र फडणवीसांनाच केला सवाल; म्हणाले…
Just Now!
X