करोना सावटाखाली येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत चांगलाच गोंधळ उडाला. काम वाटपावरुन सत्ताधारी काँग्रेस शिवसेना सदस्य रजेचा अर्ज देवून अनुपस्थित राहिल्याने अल्पमतात आलेल्या काँग्रेसला विरोधी भाजपने घेरले. करोना संबंधातील विषय वगळता इतर विषय नामंजुर करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना सभा आटोपती घेत सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला.

जिल्हा परिषदेतील कामे वाटपावरुन निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधारी काँग्रेसच्या काही पुढाऱ्यांनी बहुतांश कामे त्यांच्या गटातच वळविल्याने सभेत शिवसेनेचे उपाध्यक्ष वगळता सहाही सदस्य गैरहजर राहिले. कामे वाटपात नवापूर तालुक्यावरही अन्याय झाल्याने नवापूरमधील काँग्रेसच्या पाच सदस्यांनी रजेचा अर्ज देत आपली नाराजी अप्रत्यक्षरित्या उघड केली. सभेत ज्या कामांवर चर्चा झाली नाही, ते विषय आयत्यावेळी इतिवृतात टाकून चुकीच्या पद्धतीने त्याला मंजुरी घेतली जात असल्याचा आक्षेप भाजप सदस्यांनी नोंदवला. विशेष म्हणजे या विषयांना अनुमोदन म्हणून भाजप सदस्यांनी नावे घेतल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांनी केला. त्यामुळेच पत्रिकेतील २६ पैकी २३ व्या क्रमांकाचा करोना अनुशंगाने असलेला विषय आणि काही कर्मचाऱ्यांच्या देयकांचा विषय वगळता सर्व विषय नामंजूर करण्यावर सर्व भाजप सदस्य ठाम राहिले.

सभागृहाची उपस्थिती अवघी ४३ असून नामंजुरीसाठी हवे असल्यास मतदान घ्यावे, असा आग्रह भाजप सदस्यांनी धरला. बांधकाम सभापतींनी अध्यक्षांच्या अधिकारात असल्याने कामकाज सुरू ठेवण्यास सांगितल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. अखेर सर्व भाजप सदस्य आक्रमक होत मंचाजवळ जमा होऊ लागल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांनी सभा आटोपती घेत तत्काळ सभागृहातून काढता पाय घेतला. यानंतर भाजप सदस्यांनी अर्ध्या तासाहून अधिक काळ सभागृहातच ठाण मांडत प्रतिसभेची मागणी केली. यानंतर जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बेडसे यांनी भाजप सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर शेवटी भाजप सदस्य सभागृहाबाहेर पडले.

सभेनंतर काम वाटपाबाबत मनमानी कारभार करु पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपच्या सोबतीने काँग्रेस आणि सेनेच्या सदस्यांनी चांगलाच धडा शिकवला. विशेष म्हणजे शिवसेनेला सोबत घेत काँग्रेसने सत्ता स्थापन केली असतांनाच सभापती निवडीवेळी मात्र सेनेच्या पाठीत खंजीर खोपसून भाजप आणि काँग्रेसचे सभापती निवडून आणत शिवसेनेला दिलेला शब्द डावलण्यात आला होता. आता शिवसेनेने त्याचा हिशेब चुकता करण्यास सुरूवात केली आहे.