पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शिवबंधन सोडून हाती घड्याळ बांधलं. मात्र ही बाब मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना रुचलेली नाही. कारण पारनेरमधले शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करुन अजित पवार यांना हा निरोप पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी ४ जुलै रोजी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुचलेली नाही. शनिवारी बारामतीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. ४ जुलै रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरुडे, डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी आणि किसन गंधाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आणलेल्या पाच नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला.

आता मात्र फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत पाठवल्याचं वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे.