एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचं तिकीटं नाकारण्यामागील कारणं देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यादीच सांगितली होती. विधानसभेला खडसेंच्या मुलीला तिकीट देण्यात आलं, असंही ते म्हणाले होते. त्याचबरोबर इतरांचीही नावं का नाकारण्यात आली असावी, यावरही भाष्य केलं होतं. पाटील यांनी भूमिका मांडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आता पुन्हा नव्यानं प्रश्न उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी काही बाबींवर भाष्य केलं होतं. “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं होतं,” अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेवर एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीतून उत्तर दिलं.

“मग पडळकराना का दिलं? ते का अपवाद ठरले? चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी सांगायला ते कारण आहे. पंकजा मुंडे यांच्याशी माझं बोलणं झालं, पण त्याबद्दल मी बोलणार नाही. हे म्हणतात सुनेला तिकीटं दिलं, मुलीला तिकीटं दिलं. आम्ही कुठे मागितलं होतं मुलीसाठी तिकीट? माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं. माझी मुलगी ढसाढसा रडत होती, मला तिकीट नको म्हणून तरी तिला जबरदस्ती तिकीटं दिलं. का दिलं? मला जाणूनबुजून तिकीट नाकारलं. नाथाभाऊंसारखा स्पर्धक परत तयार व्हायला नको होता. मी सांगितलं होत, इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे, माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस्ती तिकीट दिलं,” असं सांगत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं.