लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. कुठलाही निवारा नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला शिर्डी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा करण्याच्या गाडीतून रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विठ्ठल नारकर असे या वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. साईबाबा संस्थानकडे शेकडो रुग्णवाहिका आहेत, तरीही एका वृद्ध व्यक्तीला कचरा गोळा करण्याच्या गाडीतून रुग्णालयात नेल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मुंबईचे असलेले विठ्ठल नारकर (वय अंदाजे ७५ पेक्षा जास्त) हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून साईबाबा मंदिरामागील पिंपळगाव रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. त्यांची कोणतीच हालचाल नसल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत नगर पंचायत कार्यालयाला माहिती दिल्यावर आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नारकर यांचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे बघितल्यावर कर्मचाऱ्यांनी नारकर यांना एका चादरीवर ठेवून कचरा गोळा करण्याच्या गाडीतून रुग्णालयाकडे नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
शिर्डी नगर पंचायतीच्या आरोग्य विभागाकडे एकही रुग्णवाहिका नसल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. मात्र, साईबाबा संस्थानकडे शेकडे रुग्णवाहिका असताना त्यांच्याकडून रुग्णवाहिका का घेण्यात आली नाही, असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे. दरम्यान, विठ्ठल नारकर यांच्या नातेवाईकांचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत.