टाळेबंदीतील एकटेपणा ज्येष्ठ नागरिकांच्या जिवावर

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : सध्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका घरात एकटय़ाने राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.  शिक्षण तथा नोकरीमुळे मुले परदेशी असल्याने वसईतील अनेक कुटुंबांतील ज्येष्ठांना  घर म्हणजे कारागृहासारखे भासत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे अशा वृद्धांच्या अडचणींकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.वसई—विरार शहरातील अनेक तरुण शिक्षण तसेच नोकरीनिमित्त परदेशात आहेत. काहीजण कायमचे परदेशात स्थायिक झाले आहेत. विशेषत: पश्चिम पट्टय़ातील अनेक टुमदार बंगल्यांमध्ये वृद्ध आईवडील मुलांअभावी एकाकी जीवन जगत आहेत. काही घरांमध्ये वृद्धांच्या मदतीसाठी मदतनीस ठेवण्यात आले असले तरी टाळेबंदीमुळे वाहतुकीची साधने बंद झाल्याने मदतनीसांना कामावर जाणे  दुरापास्त झाले आहे. कित्येक कुटुंबातील एकाकी वृद्ध घरकामाबरोबरच दैनंदिन गरजांसाठी  मदतनीसांवर अवलंबून असतात. स्वयंपाक, स्वत:ची देखभाल, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी यासाठी मदतनीसांवर अवलंबून असलेल्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांचे टाळेबंदीच्या काळात प्रचंड हाल होत आहेत.

कित्येक घरांमध्ये ज्येष्ठांच्या मदतीसाठी कोणीच नाही. त्यातही वृद्धापकाळामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने अशा वृद्धांच्या अडचणीत भर पडत आहे. बऱ्याच जणांना उपचारांसाठी वरचेवर दवाखान्यात जावे लागते. अशा ज्येष्ठांना दळणवळणासाठी कोणतीच साधने उपलब्ध नाहीत. त्यात खासगी दवाखानेही बंद असल्यामुळे अशा वृद्धांचे जगणे प्रचंड हलाखीचे झाले आहे.

काही सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरावर काही व्यक्ती एकाकी वृद्धांना मदत करण्याचा प्रय करीत आहेत. पण, अनेकांपर्यंत ते पोचू शकत नाहीत. अशा अडचणीच्या परिस्थितीत  अनेक  ज्येष्ठांचे मानसिक संतुलन बिघडण्याचा धोकाही व्यक्त होत आहे. टाळेबंदीमुळे वृद्ध  नागरिकांना घरातच एकांतात एका प्रकारच्या बंदिवासात जगावे लागत आहे. त्यामुळे मानसिक ताणालाही सामोरे जावे लागत आहे.

शासनाने यंत्रणा वापरून एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ गट तयार करावा. जेणेकरून अशा ज्येष्ठांच्या अडचणी सोडवता येतील. यापूर्वी वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांचे असे गट तयार करण्यात आले होते. त्यातून अनेक ज्येष्ठांना तातडीच्या प्रसंगी मदत ही झाली होती.

-मिलिंद खानोलकर, मी वसईकर अभियान

आम्ही यापूर्वीच ज्येष्ठ नागरिकांचा ‘व्हॉट्सअ‍ॅॅप’ गट तयार केला असून त्याद्वारे घरातील एकाकी ज्येष्ठांच्या समस्या जाणून त्यांना मदत करीत आहोत. याशिवाय ओळखीच्या व्यक्ती तथा समाज माध्यमातून एकांतात राहणाऱ्या वृद्धांना  दिलासा दिला जात आहे.

-विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक