कनिष्ठ क्लार्क पदावर काम करणाऱ्या अशोक कांबळे (३६) यांच्या आत्महत्येप्रकरणी चिंचवड पोलिसांनी त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ क्लार्क संगीता जायभाय (४४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगीता जायभाय यांच्यावर अशोक कांबळे यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. पुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करणाऱ्या अशोक कांबळे यांनी मागच्या महिन्यात २२ मार्चला वाल्हेकरवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

संगीता त्रास देत असल्यामुळे अशोक यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. अशोकची पत्नी अमृता (२९) गृहिणी असून ती चार वर्षांच्या मुलाला घेऊन आई-वडिलांकडे राहायला गेली होती. त्यावेळी अशोकने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जायभाय माझ्या नवऱ्याचा छोटया छोटया चुकांवरुन सर्वांसमक्ष अपमान करायच्या. त्यामुळे ते निराश झाले होते. त्याच हताशेतून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप अमृताने केला.

अशोक कांबळेनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांकडे असून त्यांनी कलम ३०६ अंतर्गत संगीता जायभाय विरोधात गुन्हा नोंदवला आहे. महिला सहकाऱ्यांसमोर संगीता जायभाय माझ्या भावाचा सतत पाणउतारा करायच्या. बिल बनवताना त्याच्याकडून चूक झाली त्यावेळी जायभाय यांनी कारवाई करण्याची धमकी दिली होती असे अशोकचा भाऊ प्रवीणने सांगितले.