सोलापूर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव विठ्ठलराव साठे (८०) यांचे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. पाच दशके पत्रकारितेत कार्यरत राहताना साठे यांनी माहिती अधिकार चळवळीची मुळे रुजविली व त्या बळावर भ्रष्टाचाराची काही प्रकरणे उजेडात आणली होती. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्य़ात पडलेल्या भीषण दुष्काळाच्यावेळी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सार्वत्रिक स्वरूपात होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे ते अडचणीत आले होते. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त जनतेची तहान भागविण्यासाठी उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी करीत शंकरराव साठे यांनी या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाला पुणे जिल्ह्य़ातील भामा आसखेड धरणातून उजनी धरणात दोन टीएमसी पाणी सोडणे भाग पडले होते. त्या वेळी साठे हे प्रकाशात आले होते. ज्येष्ठ दिवंगत संपादक रंगा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच दशके पत्रकारितेची सेवा करणारे साठे यांनी नंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात सहभागी होऊन माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून काही भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणली होती. यात मोहोळ तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू घोटाळा गाजला. या घोटाळ्यात मोहोळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांना नंतर तुरूंगात जावे लागले होते. साठे यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.