26 February 2020

News Flash

बालरंगभूमीचे जनक श्रीनिवास शिंदगी यांचे निधन

बालरंगभूमीचे जनक साहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे

बालरंगभूमीचे जनक साहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

शिंदगी सरांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर , स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा,  भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक नाटक गाजली आहेत. शिंदगी सरांच्या मार्गदर्शनाखाली बालवयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजण पुढे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक झाले. शिंदगी सरांचे बालरंगभूमीवरचे योगदान पाहून नाटककार केशवराव दाते यांनी त्यांनी ‘बालरंगभूमीचे जनक’ अशी उपाधी दिली होती. शिंदगी सरांनी अनेक कथा, कविता, कविता संग्रह,  गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्या बरोबरच त्याचं व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे. पुंगीवाला हे बालनाट्य ही अजरामर कलाकृती शिंदगी सरांचीच. या पुंगीवाला बालनाट्याचे शेकडो प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केलं होत. पुंगीवाला हे बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणार पाहिलं बालनाट्य आहे.  अनेक सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी शिंदगी सरांच्या अनेक बाल नाट्याचे प्रयोग सादर करण्यात आलेले आहेत.

श्रीनिवास शिंदगी यांनी २० नाटके लिहिली त्यापैकी १५ बालनाट्ये आहेत. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार घडवले.

मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्डच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी सरांनीच केला. ‘दहा लाखाचा धनी’ या  नाटकाच्या वेळी शिंदगी यांनी या आधुनिक तंत्राचा पहिल्यांदा वापर केला. प्रख्यात अभिनेत्री व सौंदर्याचा आयटमबॉम्ब म्हणून ज्यांनी रंगभूमीवर व चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली त्या पद्मा चव्हाण यांनी रंगमंचावर पहिली एन्ट्री याच नाटकातून घेतली होती हे विशेष.

साहित्य,  लेखन, अभिनय याच बरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारा वतन , वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार करून त्याचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. या कार्यक्रमाच्या ध्वनिफिती ही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळूया याही ध्वनिफितींची त्यांनी  निर्मिती केलेली आहे.

श्रीनिवास शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘ भूमिपुत्रांचे वनपूजन ‘ हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बालनाट्याला महाराष्ट्र राज्यशासनाचा उत्कृष वाड:मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला आहे.

श्रिनिवास शिंदगी यांनी बालकुमार साहित्य संमेलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. बालकांच्या भावजीवनाशी निगडीत असा ‘गाण्यांचा गाव‘ नटवर्य केशवराव दाते यांच्या प्रेरणेने शिंदगी सरांनी सांगली येथे आद्य बाल रंगभूमीची स्थापना केली.‘काव्यदर्शन ‘ व गोष्टी शब्द स्वरांच्या रचणारे एक सुरेल साहित्यिक अशी श्रीनिवास शिंदगी यांची ओळख राहिल.

First Published on July 12, 2018 9:11 am

Web Title: senior litterateur srinivas shindagi passes away
Next Stories
1 डहाणूमध्ये प्रवाशांचा रेल रोको
2 स्वतंत्र माहिती व तंत्रज्ञान विभाग स्थापणार
3 शिक्षकांच्या मोर्चात कुख्यात गुंड
Just Now!
X