रवींद्र जुनारकर

नांदेड येथून पसार झालेल्या तीन संशयीत रूग्णांना माणिकगड (गडचांदूर) येथे बुधवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, येथे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे व नांदेड येथील व्यक्तींची नावे वेगवेगळी असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, टाळेबंदीच्या काळात समाज माध्यमावर चुकीची माहिती आणि अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

नांदेडच्या गुरूव्दारामध्ये शनिवारी २० करोनाबाधित रूग्ण मिळाले. त्यातील ३ रूग्ण फरार झाले. दरम्यान, या जिल्ह्यातील माणिकगड येथे तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या ३ नागरिकांची नांदेड प्रशासनाकडून पुढील पडताळणी होणार आहे. खबरदारी म्हणून नांदेड येथील एक पथक रूग्णवाहिकेसह चंद्रपूर येथे येऊन ताब्यात घेतलेल्या तीनही नागरिकांना तपासणी व पडताळणीसाठी नांदेड येथे घेऊन गेले आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयानं दिली. मात्र, असे असतांनाही चंद्रपूरात नांदेड येथून फरार झालेले तीन रूग्ण मिळाल्याचे वृत्त समाज माध्यमावर झळकले. त्यामुळे जिल्हा व पोलीस प्रशासनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अफवांवर विश्वाास ठेवू नये. जनतेमध्ये भीती निर्माण होईल असे संदेश किंवा माहिती विशेषत: कोरोना आजारा संदर्भातील सर्व वृत्त जिल्हा प्रशासनाकडून दिल्याशिवाय माध्यमांनी देऊ नये तसेच सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

कोरोना विषाणूच्या संदर्भात वेबपोर्टलवर अनधिकृतपणे बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्याातील अनेक सोशल मीडियांतून २ दिवसांपूर्वी एका अज्ञात वेबपोर्टलकडून जिल्ह्यात १४ करोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यापूर्वी एका रुग्णाचा अहवाल फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता, अशा अनेक चुकीच्या बातम्याही पोर्टलवर झळकत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश या बातम्यातून दिसून येतो. अशा पोर्टलचा तपास करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात काही वादग्रस्त पोर्टल व चुकीच्या बातम्या देणाऱ्या संकेतस्थळांवर सायबर विभागाने लक्ष ठेवावे व दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.