निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांची धावपळ सुरू असतानाच हर्णै गावातील सदोष पंचनाम्यांच्या मुद्दय़ाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तहसिलदार समीर घारे यांनी याप्रकरणी आज ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊ न फेरपंचनामे करण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी ग्रामस्थांनी या सदोष पंचनाम्यावरून तहसिलदारांसमोर गोंधळ घातल्याने वातावरण तंग झाले होते.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका हर्णे गावालाही जबरदस्त बसला. नुकसान भरपाईचा निधी वाढवण्यात आला. यामध्ये घरांच्या पूर्णत: नुकसानीपोटी दीड लाख रूपये मिळणार असल्याचे जाहीर झाले. मात्र पंचनामे झाल्यानंतर त्याची यादी ग्रामपंचायत कार्यालय व रेशन दुकानात लोकांच्या पाहणीसाठी ठेवण्यात आली. यावेळी घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या यादीमध्ये एकाच कुटुंबातील अनेक जणांची नावे असल्याचे निदर्शनास आले. आणि इतर लाभार्थ्यांच्या नावांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत पंचनामा यादी करणाऱ्यांचा निषेध केला. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊ न  उपविभागीय अधिकारी शरद पवार व तहसीलदार समीर घारे यांनी फेरपंचनाम्यांची हमी दिली होती. त्यामुळे केंद्रीय पथकासमोर वातावरण शांत राहिले.

मात्र सोमवारपर्यंत फेरपंचनाम्यांबाबत ठोस कार्यवाहीची माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर पुन्हा मोर्चा काढला. यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह  मान्यवर ग्रामस्थांनी  तहसीलदार समीर घारे यांची दापोलीत भेट घेतली.

यावेळी पंचनामे सदोष झालेले असल्याचे ग्रामपंचायतीचे पत्र तहसीलदारांना देत दोषींवर कडक कारवाईची मागणी  करण्यात आली. त्यानुसार तहसीलदारांनी मंगळवारी सकाळी नऊ  वाजता ग्रामस्थांशी बोलतो, असे शिष्टमंडळाला सांगितले. ते लक्षात घेऊन मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी हर्णे ग्रामपंचायतीसमोर गर्दी केली.

मात्र सव्वाअकरा वाजेपर्यंत तहसीलदार न आल्याने ग्रामस्थांचा असंतोष वाढला. तहसीलदार येईपर्यंत सरपंच, उपसरपंचासह कोणीही , ग्रामपंचायत कार्यालयात जायचे नाही आणि ग्रामपंचायत कार्यालय बंद करून घ्यायचे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीबाहेर रस्त्यावर लोकांची गर्दी झाली होती. हा गोंधळ सुरू असताना साडे अकरा वाजता तहसिलदार तेथे दाखल झाले.त्यानंतर झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार व त्यांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला.

पंचायत समिती सभापती रऊ फ हजवानी यांनी देखील  लोकांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र गोंधळ थांबला नाही. येथे अनेकांनी आपल्या घरी अद्याप कोणीही सरकारी अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेला नसल्याचे तहसिलदारांना सांगितले. त्या गोंधळातच तहसीलदार समीर घारे यांनी उपस्थितांना फेरपंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे, तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर तहसीलदारांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व फेरपंचनाम्याला आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाबरोबर बैठक घेत तातडीने कार्यवाहीची सूचना केली.