देशात टाळेबंदीनंतर मुंबई, ठाण्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात आपल्या गावाकडे जात आहेत. मात्र जिल्हा व राज्य सीमा बंद करण्यात आल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अनेक नागरिक अडकून पडले होते. यावर तोडगा काढण्यात शासनाला यश आले आहे. यापैकी बहुतांश नागरिकांना कामाच्या ठिकाणी परत पाठविण्यात आले असून सुमारे नऊशे नागरिकांना तलासरी व बोईसरजवळील आश्रमशाळेत आश्रय देण्यात आला आहे.

रेल्वे तसेच इतर सर्व वाहतूक बंद असल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते. तलासरी तालुक्यातील आच्छाडजवळ पोहोचले असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्याने शेकडोंच्या संख्येने लोक या ठिकाणी खोळंबून पडले आहेत. जमावबंदी आणि संचारबंदी असताना ही सर्व मंडळी एकत्रित रस्त्यावर बसून आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र आपल्या मूळ गावी जाण्याचा त्यांचा अट्टहास कायम असल्याने तणावाचे वातावरण होते. मात्र यावर तोडगा काढण्यात शासनाला यश आले आहे. अनेकांना वाहनांच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले. तलासरी येथील ठक्करबाप्पा विद्यालयात ७००, खुंटल (बोईसर) आश्रमशाळेत १५० तर वडराई येथे ४५ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. येथील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था केली आहे.

गुजरातच्या दिशेने पायी प्रवास सुरूच

सीमा भागात अडकलेल्यांना परत पाठविण्यात येत असताना शुक्रवारी महामार्गावर गुजरातच्या दिशेने पायी प्रवास सुरूच होता. एक हजारांहून अधिक नागरिक तलासरी भागात दाखल झाले आहेत. काही जणांना खानिवडे व चारोटी टोल नाक्याजवळ रोखण्यात येत आहे. तसेच महामार्गावर अडकून पडलेल्या नागरिकांना महसूल अधिकारी त्यांच्या आश्रयाची व्यवस्था करीत आहेत.

स्थलांतर थांबविण्याचे राज्यपालांचे निर्देश

करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी विभागीय आयुक्तांना दिले. राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना विषाणू संक्रमण व नागरिकांचे  स्थलांतर याबाबत माहिती घेतली. सर्व मोठय़ा शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांना थांबण्याचा आग्रह करावा. त्यांच्या आणि अन्य राज्ये किंवा जिल्ह्यंमधून येत असलेल्या नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था शासन किंवा स्वयंसेवी संस्थामार्फत करावी, अशी सूचना राज्य़पालांनी विभागीय आयुक्तांना के ली.

गडकरी यांचे टोल ठेके दारांना आवाहन

करोना संकटामुळे रोजीरोटी बंद झालेले देशभरातील हजारो कामगार आपल्या गावी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून जात आहेत. मानवतेच्या भूमिकेतून त्यांना अन्न—पाणी व अन्य आवश्यक मदत देण्याची सूचना केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.या कठीण परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पथकर कंत्राटदार यांनी ही जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.