13 August 2020

News Flash

मिरजेत १२ तासांत करोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू

२५ रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ

संग्रहित छायाचित्र

दिगंबर शिंदे

इस्लामपूर आणि आसपासच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागताच शासकीय यंत्रणा जागी झाली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात स्वतंत्र ३१५ खाटांचे कक्ष १२ तासांत सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचा कार्यभार सध्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून मंगळवारपासून या ठिकाणी करोना विषाणू तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली.

जिल्हय़ातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबाशी संबंधित २५ रुग्ण सापडल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या आणि महापुराच्या काळामध्ये चांगली वैद्यकीय सेवा दिलेल्या डॉ. सापळे यांना पुन्हा सांगलीत पाठविण्यात आले.

मिरजेतील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात रात्रीत हलविण्यात आले. सध्या या रुग्णालयामध्ये २५ रुग्ण उपचारांसाठी दाखल असून त्यांची प्रकृती साधारण आहे.

मिरजेतील रुग्णालयामध्ये करोना विषाणूची लागण ओळखण्यासाठी स्वॅबचे नमुने तपासण्यासाठीची प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली. या ठिकाणी डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी, डॉ. प्रकाश धुमाळ आणि संशोधनशास्त्रज्ञ संदीप वाळूजकर हे काम करीत आहेत.

सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातील रुग्णांसाठी या लॅबचा वापर करण्यात येणार असून या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून त्याचा अहवाल पुण्यातील विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात येईल आणि त्यानंतर या बाबतचा अंतिम अहवाल प्राप्त होणार आहे.

करोनाबाधित रुग्णांपासून संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिसण्यास दोन ते आठ दिवस लागतात. बहुतांशी रुग्णांमध्ये सहाव्या अथवा सातव्या दिवशी करोनाची लक्षणे दिसू लागतात. यामुळे कोरडा खोकला, तीव्र ताप ही प्राथमिक लक्षणे असली तरी ही लक्षणे केवळ करोनाचीच असतील असेही नाही. यामुळे अशा रुग्णांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत करणे महत्त्वाचे ठरते, असे डॉ. सापळे यांनी सांगितले.

इस्लामपूरला चौघांमध्ये करोनाची लक्षणे १९ मार्चपासून दिसू लागली. त्यानंतरही दोन दिवसांनी म्हणजे २१ मार्च रोजी त्यांना इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले.

यादरम्यान कोल्हापूर जिल्हय़ातील त्यांच्या नातेवाईक महिलेलाही करोनाची लागण झाली. या कुटुंबाच्या संपर्कामध्ये आलेल्या चौघांचे अहवाल २२ मार्च रोजी आणि १२ जणांना २६ मार्च रोजी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

* इस्लामपूर येथील एक कुटुंब सौदी अरेबियाहून १३ मार्च रोजी मुंबईत आले. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतीही करोनाची लक्षणे आढळली नाहीत.

* त्याच दिवशी खास मोटारीने त्यांचे इस्लामपूरला आगमन झाले. मात्र त्यांना घरातच अलगीकरण करून राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्काही मारण्यात आला होता. मात्र त्यांनी या निर्देशाला गांभीर्याने घेतले नाही.

* १४ मार्चपासून त्यांनी इतर लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. धार्मिक यात्रा करून आल्याच्या निमित्ताने  नातलगांना बोलावून जेवणावळही केली.

मिरजेतील करोना रुग्णालय  १२ तासांत सुरू करण्यात आले असून उत्तमोत्तम सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालय शहराच्या बाहेर असल्याने नैसर्गिकरीत्या अलगीकरण झाले असून या रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभाग आणि अन्य आजारांसाठी येणारे रुग्ण  सांगलीच्या रुग्णालयात सेवा घेऊ शकतात.

– डॉ. पल्लवी सापळे, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 12:47 am

Web Title: separate room for corona artery started within 12 hours abn 97
Next Stories
1 ज्वारी, द्राक्षे, बेदाणे उत्पादकांना फटका
2 नगरमधील करोनाबाधितांची संख्या आठ वर
3 वसंतदादा साखर कारखान्यात ‘सॅनिटायझर’ची निर्मिती सुरू
Just Now!
X