वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन पोहचल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागू शकते, असा धमकीवजा इशारा स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी दिला. स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन आता अशा टप्प्यावर येऊन पोहचले आहे की, मला एका गोष्टीची भीती वाटते. आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले नाही किंवा या मुद्दयावर कायदेशीर तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन हिंसक होण्याची शक्यता अणेंनी रविवारी नागपूरात झालेल्या कार्यक्रमात बोलून दाखविली. वेगळ्या विदर्भाचे आंदोलन हाताबाहेर जाऊ शकते. त्यात हिंसाही होऊ शकते. राग आणि उद्वेगाच्या भरात आगडोंब उसळू शकतो, असे अणेंनी यावेळी म्हटले. विदर्भाचे आंदोलन शांततेत व्हायला पाहिजे, हिंसा नकोच, असे आमचे मत आहे. मात्र ज्याअर्थी दिल्ली आणि अकोल्यामध्ये हिंसक घटना घडल्या. त्यानंतर हिंसेची शक्यता नकारता येत नाही, असा सूचक इशारा अणेंनी यावेळी दिला. याशिवाय, अकोल्यातील कार्यक्रमात शिवसैनिकांनी घातलेल्या धुडगुसावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला होता. हाच धागा पकडत अणेंनी शिवसेनेला महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच लाठ्य़ा खाव्या लागल्या असतील, असा टोलाही लगावला.