हर्षद कशाळकर

वर्षभरात ३२ जण दगावले; कागदी घोडे नाचविण्यापलीकडे शासन स्तरावर हालचाली नाहीत

आंबेनळी घाटात गेल्या वर्षभरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ३२ जणांना आपले जीव गमावले. तर दैव बलबत्तर होते म्हणून दोघे जण जेमतेम बचावले. घाटात सतत होणाऱ्या या अपघातांमुळे घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे, पण शासनस्तरावर कागदी घोडे नाचवण्यापलीकडे फारशी हालचाल झालेली नाही.

थंड हवेचे ठिकाण असल्याने ब्रिटिशांनी पोलादपूर मार्गे कोकण आणि महाबळेश्वर यांना जोडणारा रस्ता तयार केला. १८७१ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. १८७६ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. जवळपास पाच वर्षे अत्यंत दुर्गम परिसरात या रस्त्याचे काम सुरू होते. उंचच उंच डोंगररांगा आणि एका बाजूला खोल दऱ्या अशा ४० किलोमीटर घाटमाथ्यावरून हा रस्ता बांधला गेला. पावसाळ्यात या रस्त्याने महाबळेश्वरला जाणे हा विलक्षण अनुभव असला तरी नागमोडी वळणे आणि तीव्र चढउतार आणि अरुंद रस्ते यामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी आला.

महाबळेश्वर येथून फरशी वाहून नेणारा ट्रक पोलादपूरच्या दिशेने येत होता. दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने हा ट्रक पहाटे बावलीटोक येथे दरीत कोसळला. यात ट्रकचालक प्रशांत जाधव आणि क्लीनर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. आंबेनळी घाटात गेल्या वर्षभरात अशा तीन घटना घडल्या. त्यात ३२ जणांचा जीव गेला. तर दोन जण दैवबलबत्तर होते म्हणून वाचले.

२० ऑक्टोबर २०१८ ला पुण्यातील भोसरी येथे राहणारे प्रशांत राजेंद्र सस्ते आपल्या बीएमडब्लू गाडीने पोलादपूरहून महाबळेश्वरच्या दिशेने निघाले होते. दाभिळ गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर त्यांची गाडी दरीत कोसळली, मात्र सुदैवाने ही गाडी एका झाडाला जाऊन अडकली. यात चालक प्रशांत सस्ते थोडक्यात बचावले होते. तर २८ जुलै २०१८ रोजी दापोली कोकण कृषी विद्यापीठाची एक बस दाभिळ गावाजवळ ६०० खोल दरीत कोसळली होती. या भीषण ३० जणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक कर्मचारी आश्चर्यकरीत्या बचावला होता.

घाटपरिसरात सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे रस्त्यांच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेनंतर राज्य सरकारने या घाटातील रस्त्यांच्या दुरुस्तीची ग्वाही दिली होती. पण बस दुर्घटना झालेल्या ठिकाणी किरकोळ संरक्षक कठडेही बसविण्यापलीकडे फारसे काही झाले नाही. बुधवारी झालेल्या दुर्घटनेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे घाटातील रस्तादुरुस्ती आणि देखभालीसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेच आहे.

कोकणात दरवर्षी सुमारे साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. यामुळे या पर्वत रांगांमधील मार्गावर दरवर्षी भूस्खलनाच्या लहान-मोठय़ा घटना घडतात. दरडी कोसळून लालमाती आणि पाणी रस्त्यावर येत असते. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनतात. या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण कमी असल्याने देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात.

रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. धोकादायक ठिकाणावर सैल झालेली दगडमाती तातडीने हलवणे गरजेचे आहे. धोकादायक वळणे काढावी लागणार आहेत, सुरक्षा कठडे बसवणे गरजेचे आहे. रस्त्यावर धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे लागणार आहेत, साइड पट्टय़ांची कामे करावी लागणार आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. आंबेनळी घाटाबरोबरच महाड-भोर रस्त्यावरील वरंध घाटाची देखभाल-दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे.

आंबेनळी घाटात संरक्षक कठडे बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. काही धोकादायक वळणेही रुंद करण्यात आली आहे. पण बरेचदा वाहनचालक बेदरकारपणे गाडय़ा चालवतात, आणि अशा दुर्घटना घडतात. वाहनचालकांनी घाटात गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेच आहे.

– भरत गोगावले, महाडचे शिवसेना आमदार

आंबेनळी घाट दुर्घटनेनंतर घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे केली जातील असे जाहीर केले होते. मात्र किरकोळ खड्डेदुरुस्ती आणि संरक्षक कठडे बसवण्यापलीकडे काही झाले नाही. संरक्षक कठडय़ांची कामेही योग्य प्रकारे झालेली नाहीत. मोठी वाहने रोखून धरण्याची क्षमता या संरक्षक कठडय़ामध्ये दिसून येत नाही. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करणेही गरजेचे आहे.

– प्रकाश कदम, स्थानिक