लातूर : करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय अथवा खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरची खाट मिळणे अतिशय दुर्लभ. त्यात रुग्ण गरीब घरचा असेल तर त्याची हेळसांड विचारूच नका. लातूर तालुक्यातील एका खेडेगावातील गरीब रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णवाहिकेत घालून शहरातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कुठेही रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. रुग्णाची प्राणवायूची पातळी ४०, तर एचआरसीटी स्कोअर २२ त्यामुळे रुग्णाला दाखल करून घेण्याचे धाडस कोणीच दाखवत नव्हते. अखेर रात्री ११.४५ वाजता पूरणमल लाहोटी कोविड सेंटरमध्ये प्राणवायूसहित एक खाट शिल्लक असल्याने त्या रुग्णाला दाखल करून घेण्यात आले.

२२ एप्रिलची ही घटना..

डॉ. प्रशांत माले तेथे उपस्थित होते. त्यांनी रुग्णाची अवस्था पाहिली व रुग्णाच्या नातेवाइकांना मी प्रयत्न करतो. रुग्णाच्या आयुष्याची शाश्वती देता येत नाही, अशी स्थिती असल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकांजवळ अन्य कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी डॉक्टरांना तुमच्या परीने प्रयत्न करा असे सांगितले. रुग्णाची स्थिती अतिशय नाजूक होती. व्हेंटिलेटर शिल्लक नव्हते. प्राणवायूच्या खाटेवर रुग्णास ठेवून उपचार सुरू केले. रेमडेसिविर इंजेक्शनही उपलब्ध नव्हते. उपलब्ध साधनसामग्रीवर डॉ. प्रशांत माले यांनी आपले सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावत रुग्णावर उपचार सुरू केले. सुदैवाने रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारणास सुरुवात झाली. आश्चर्य म्हणजे २८ एप्रिल रोजी सायंकाळी रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले. तुटपुंज्या साधनसामग्रीवर डॉ. प्रशांत माले यांनी केलेल्या उपचारामुळे रुग्ण बरा झाला. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या रुपाने देवच पावल्याची भावना व्यक्त केली. महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी डॉ. माले यांचे कौतुक केले.