दिगंबर शिंदे

मोबाइलवर अश्लील चित्रपट पाहून १५ वर्षांच्या मुलाने सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकार सांगलीजवळ तुंग येथे नुकतीच घडला, तर कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी इंटरनेटवर माहिती मिळवून केवळ मौजमस्ती करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याचीच महागडी दुचाकी लंपास केली. न कळत्या वयामध्ये मुलांच्या हाती स्मार्ट मोबाइल हाती  दिला तर त्याचे भीषण परिणाम दिसून येत आहेत.

तुंग येथील घटनेत संबंधित बालिकेला अश्लिल चित्रफीत दाखवत अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचा विरोध होत असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. यात दोष कोणाचा? मुलाच्या हाती नको त्या वेळी माहितीचे भांडार खुले करण्याचा आग्रह धरणारे की त्याचा यथायोग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्याचा अभाव हा मूलभूत प्रश्न आहे.करोना संसर्गामुळे येत्या काळामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत.  करोनाबरोबर जगणे ही काळाची गरज बनणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न पालकांबरोबरच शिक्षण व्यवस्थेला प्राधान्याने सोडवावा लागणार आहे. शिक्षण पद्धतीत आता नवीन बदल स्वीकारत असताना तंत्रस्नेही भूमिका घेणे अपरिहार्य असल्याचे दिसत आहे. मात्र ही भूमिका आणि पारंपरिकता याचा विचार करणे गरजेचे ठरणार आहे.

शाळा, महाविद्यालयातील शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह सध्या धरला जात असतानाच या शिक्षणातील महत्त्वाचा भाग असलेल्या समाजमाध्यमांचा वापर होणे अपरिहार्य आहे. या समाजमाध्यमांचा वापर करण्यासाठी मूलभूत गरज निर्माण झाली आहे. मात्र मोबाइल लहान मुलांच्या हाती देत असताना त्याला यातील काय खरे आणि काय आभासी याची माहिती देण्याची जबाबदारी पालकांवर आणि ज्ञानदान करणाऱ्या शिक्षक वर्गावर येणार आहे.समाजाचा पुढाकार महत्त्वाचा किशोरवयीन मुले ही माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करतात.

भावी पिढी सदृढ आणि तंत्रस्नेही होत असताना संस्कारक्षम बनविणेही तितकेच गरजेचे आहे. बदलत्या पिढीला रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावेच लागणार आहे. मात्र ही आव्हाने स्वीकारत असताना समाजस्वास्थ्य अबाधित राहिले पाहिजे. यासाठी समाजानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुरळप येथे दोन अल्पवयीन मुलांकडून झालेली दुचाकी चोरीची घटना. या घटनेतील मुलांनी एका पोलीस अधिकाऱ्याची दुचाकी लंपास करीत अनेक गावांचा आणि तेही टाळेबंदी असताना प्रवास केला. इंटरनेटवरून त्यांनी चोरी केली. तसे पाहायला गेले तर ही घटना किरकोळ असली तरी या मोबाइलच्या मायाजालमधून मुले काय काय शिकत आहे हे समोर येते. अनेक मुले  फावल्या वेळेचा उद्योग म्हणून मोबाइलमधील खेळाच्या आहारी जात आहेत. यासाठी मुले काय करतात याची पडताळणी सातत्याने करणे पालकांचे कर्तव्य आहे.

मुलांना तंत्रस्नेही करण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हाती मोबाइल देत आहेत.  ही आजच्या काळाची गरज असली तरी मुले नेमके यामध्ये काय करीत आहेत याची पडताळणी सातत्याने पालकांनी करावी. सदृढ कुटुंबव्यवस्था यासाठी आवश्यक आहे. मुलांसाठी ठरावीक वेळासाठीच मोबाइल देणे हितावह ठरणार असून या कालावधीत कोणते संकेतस्थळ उघडले आहे याची वारंवार आणि अचानकपणे तपासणी केली पाहिजे

-मनीषा डुबुले,अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली.

मुलींना वयात येताना ज्या पद्धतीने जागृती केली जाते, घरी आई, मोठी बहीण अथवा कुटुंबातील विवाहित महिला ज्ञान देते त्या पद्धतीने मुलांच्यात जागृती होणे गरजेचे आहे. किशोरवयामध्ये मुलांच्या मनात निर्माण होत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, शंकांचे निरसन होण्यासाठी एखादे व्यासपीठ तयार करणे ही काळाची गरज आहे

-अर्चना मुळे, समुपदेशक, संवाद ग्रुप.