मे महिन्याच्या मध्यावर रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना होत नसल्याने मुंबईच्या जवळ असलेल्या रायगडकरांची पाण्यासाठीची पायपीट अद्याप थांबलेली नाही. जिल्हय़ात सध्या ४२ गावे व १८५ वाडय़ांना ३३ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
सर्वाधिक पाणीटंचाई पेण व महाड तालुक्याला भेडसावताना दिसते आहे. पेणमधील १२ गावे आणि ४२ वाडय़ांसाठी तर महाडमध्ये ४ गावे व ५५ वाडय़ांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. पेणच्या वाशी खारेपाट परिसराला टंचाईचा अधिक सामना करावा लागतो आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने पाण्याचा अतिरिक्त वापर होत आहे. शहरी भागात नियमित पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागाला टंचाईची झळ बसल्याचे दिसून येते. अतिरिक्त वापरामुळे ग्रामीण भागात पुरवले जाणारे पाणी अपुरे पडते आहे. महाड तालुक्यातील अनेक गावे दुर्गम डोंगराळ भागात असून तेथील पाण्याचे नसíगक स्रोत आटले असल्याने तेथे टँकरने पाणी पुरवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
 गावोगावी सध्या लग्नसराईची धूम असल्याने सरकारी टँकरने पुरवले जाणारे पाणी अपुरे पडते आहे. अशा वेळी पाणीमाफियांचे फावले असून त्यांचा धंदा जोरात सुरू आहे. नागरिकांना नाइलाजास्तव भरमसाट पसे देऊन विकतचे पाणी प्यावे लागत आहे. या पाणीमाफियांचा बंदोबस्त कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने साडेसहा कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार केला असला तरी टंचाई कमी होण्याऐवजी वाढताना दिसते आहे. टंचाईची कामे कुठे सुरू असल्याचे दिसत नाहीत. दरवर्षी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या योजना हाती घेतल्या जातात. तरीदेखील टंचाई दूर होण्याचे नाव दिसत नाही त्यामुळे रायगड जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा हवेत विरल्या असून टंचाईवर मात करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर होण्याची लक्षणे दिसत असली तरी अजून मे महिन्याचे १५ व जूनचे ७ दिवस असा पाऊण महिना तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.   रायगड जिल्हय़ातील ४२ गावे व १८५ वाडय़ांना २ शासकीय व ३१ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
 तालुकानिहाय गावे व वाडय़ांची संख्या  
  पेण १२ गावे ४२ वाडय़ा, पनवेल १ गाव, कर्जत ८ गावे व १५ वाडय़ा, खालापूर २ गावे ११ वाडय़ा, माणगांव २ गावे १० वाडय़ा, रोहा १० गावे व ८ वाडय़ा, तळा ३ वाडय़ा, महाड ४ गावे व ५५ वाडय़ा, पोलादपूर ३ गावे व ३९ वाडय़ा, श्रीवर्धन २ वाडय़ा.