सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक भयावह रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था करोना विषाणूवरील लसीचं संशोधन करण्यात अग्रणी आहे. त्यांचं इतक्या वर्षांचं योगदान लक्षात घेता सायरस पुनावाला यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसेचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे. “सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युट च्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती”, असे ट्विट त्यांनी केले.

सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पुनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हेपिटायटस, स्वाईन फ्ल्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक लसी या ‘सीरम’मध्ये तयार केल्या जातात. सध्या ‘सीरम’मध्ये करोनावरील लसीवर शोध चालू असून करोनाची एक लस सरकारला २५० रुपयांना दिली जाणार आहे. तसेच एकूण लसीच्या उत्पादनापैकी ९० टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाणार आहे.