जतचे माजी सभापती, काँग्रेस नेते सुनील चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा या दोघांचा खून घरगडय़ाने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याला घटनेनंतर अवघ्या २४ तासात अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले. मालकांकडून जादा काम लावणे, मानहानीकारक वागविणे या कारणाने चिडून त्याने ते दोघे झोपेत असताना त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपीला अटक करून खुनाचा छडा लावणा-या पोलीस पथकाला पन्नास हजाराचे बक्षीस पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले.
गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या पथकाने या  खुनाचा उलगडा केला असून संशयित आरोपी परशुराम रामचंद्र हिपरगी (वय ४३) याला आज पहाटे कर्नाटकातील बरेडहट्टी, ता. अथणी येथून अटक केली.
सुनील बाळासाहेब चव्हाण यांचा व त्यांची पत्नी शैलजा यांचा डफळापूर (ता. जत) येथे काल मध्यरात्री शयनकक्षात खून करण्यात आला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती. मळ्यात हा प्रकार घडला असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. पोलिसांना या खुनाचे गूढ उकलणे आव्हान ठरले होते.
घटनेनंतर घरात काम करणारा चाकरीचा गडी फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तनात करण्यात आली होती. निरीक्षक पाटील, सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे व त्यांच्या पथकाने आरोपीचा छडा लावला. आरोपी परशुराम हा चव्हाण यांच्याकडे गेल्या ९ महिन्यांपासून चाकरीला होता. गावी त्याची ५ एकर कोरडवाहू शेती असून कामावर ठेवत असताना चव्हाण यांच्याकडून कामापोटी पन्नास हजार रूपये उचल घेतली होती. काम अध्र्यावर सोडून जाऊ नये यासाठी त्याची जमीन बॉण्डवर लिहून घेतली होती.
सुनील चव्हाण घरी धुणी, भांडी घासणे, फरशी पुसणे आदी जादा काम लावत होते. याचबरोबर फोन घेतला नाही म्हणून त्याचा मोबाईल मालकांनी फोडला होता. कामावर मानहानी होत होती या रागातून आपण मालक चव्हाण यांचा पत्नीसह शयनकक्षात झोपले असताना विळा, कोयता व चेन यांनी मारहाण करीत खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
 मालक व मालकिणीचा खून करून घरातच दारू पिऊन जेवण करून बोलेरो गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र ही गाडी पाण्याच्या हौदाला धडकल्याने तो नाद सोडून एमएच १० एझेड ३०६१ होंडा मोटारसायकल घेऊन पोबारा केला होता. घरातील सोन्याचे दागिने त्याने लंपास केले होते.
दुहेरी खुनाचा छडा अवघ्या २४ तासात लावल्याबद्दल तपास पथकातील अधिका-यांसह कर्मचारी सुनील भिसे, संजय कांबळे, गुंडा खराडे, महेश आवळे, श्रीपती देशपांडे आदीना ५० हजाराचे बक्षीस पोलीस अधीक्षक सावंत यांनी जाहीर केले.