२० हजार किमतीचे सोने फक्त चार हजार दराने देण्याची थाप मारून पुणे जिल्हय़ातील वडगाव धायरी (ता. हवेली) येथील कृष्णा पोकळे यांना २२ लाख ५० हजारांस गंडा घातल्याबद्दल ६४ वर्षांच्या वृद्धासह सात जणांना सोलापूरच्या न्यायालयाने दोषी धरून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आसीफ गफूर शेख (४९, रा. केशवनगर, सोलापूर), बाळू तुकाराम कलुबर्मे-पाटील (४०, रा. डोणगाव, ता. उत्तर सोलापूर), अंकुश शंकर पवार (२८, रा. गुजेगाव, ता. दक्षिण सोलापूर), बाळू कृष्णा पाचकवडे (४०, रा. आंबेडकरनगर, सोलापूर), मल्लिकार्जुन विठ्ठल बंडा (५२, रा. दत्तनगर, पूर्वभाग, सोलापूर), दाऊद अब्दुल शेख (६४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) व युसूफ महिबूब विजापुरे (४५, रा. सलगरवाडी, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. तेव्हा दोषी आरोपींपैकी बाळू कलुबर्मे हा न्यायालयात गैरहजर होता. तर आठवा आरोपी बालाजी (पूर्ण नाव नाही.) हा गुन्हा घडल्यापासून अद्यापि सापडला नाही. त्यामुळे त्याच्यावर स्वतंत्रपणे खटला चालवला जाणार आहे.
५ जुलै २००६ रोजी सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. आरोपी अंकुश पवार याच्याबरोबर कृष्णा पोकळे यांची ओळख होती. त्यानंतर इतरांची ओळख झाली. सोलापुरात स्वस्त दरात सोने मिळते, अशी थाप मारून आरोपींनी पोकळे यांना सोलापुरात बोलावून घेतले. पुणे नाक्याजवळ भेट झाल्यानंतर सर्वप्रथम पावणेतीन लाख, नंतर सात रस्ता येथे पावणेपाच लाखाची रक्कम आरोपींनी काढून घेतली. नंतर दहा लाख व शेवटी कर्नाटकात चित्रदुर्ग येथे पाच लाख याप्रमाणे २२ लाख ५० हजारांची रक्कम आरोपींनी पोकळे यांच्याकडून घेतली. परंतु ठरल्याप्रमाणे स्वस्तात सोने दिले नाही. यात आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच पोकळे यांनी पोलिसात धाव घेतली. या गुन्हय़ाचा तपास करून तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक वांडेकर यांनी केला होता.    
 सरकारतर्फे अ‍ॅड. व्ही. एन. देशपांडे यांनी काम पाहिले, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. यू. डी. जहागिरदार व अ‍ॅड. रियाज शेख यांनी बचाव केला.