जळगाव महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेच्या १२ नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे जिल्हा प्रमुख असलेल्या ललित कोल्हे यांनी गेल्या निवडणुकीत जळगाव शहराच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारत स्वत:सह १२ नगरसेवक निवडून आणले होते. सुरुवातीपासून त्यांनी सत्ताधारी खान्देश विकास आघाडीशी जुळवून घेतले होते. मध्यंतरी त्यांनी मनसेमधील सर्व पदांचा राजीनामा देखील दिला. यानंतर ते खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्यावर महापौर झाले.

जळगाव महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोल्हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी कोल्हे यांनी खान्देश विकास आघाडीसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत कोल्हे त्यांच्या १२ नगरसेवकांसह खान्देश विकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहे. मी व माझ्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केले नसला तरी आम्ही खान्देश विकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. यामुळे मनसेचे जळगाव शहरातील उरले सुरले अस्तित्व देखील संपण्यात असल्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.